विदर्भाला ११ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता! नाशिक व पुण्यात यांना मिळणार संधी


Last Updated on July 1, 2022 by Piyush

नागपूर : भाजप व शिंदे गट एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्रिपदांची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे आता उपराजधानी नागपूरला किमान तीन मंत्रिपदे मिळतील व विदर्भालाही झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, बच्चू कडू, परिणय फुके, संजय कुटे या अनुभवी नेत्यांसह समीर मेघे, आशिष जयस्वाल, रवी राणा यांच्या रूपात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

बावनकुळे यांना कॅबिनेट मंत्रिपदासह नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद पद मिळू शकते. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. मात्र, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांना संधी दिल्यास मेघे यांची अडचण होऊ शकते. अपक्ष गोटातून रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. राणा दाम्पत्याने शिवसेनेविरोधात एकाकी लढा दिला. याचे बक्षीस आमदार रवी राणा यांना मिळेल, असे दिसते. आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद देऊन पुनर्वसन केले जाऊ शकते.

औरंगाबादमधून संधी कुणाला?

औरंगाबाद : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता. औरंगाबादला कोण पालकमंत्री म्हणून लाभणार, यावरून चर्चा रंगते आहे. मागील १२ वर्षात जिल्ह्याला बाहेरीलच पालकमंत्री लाभले आहेत. त्यामुळे नवीन सरकारमध्ये जिल्ह्यातील जे मंत्री होतील, त्यांच्याकडेच पालकमंत्री जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे.

आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते. तर आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांच्यापैकी आ. सावे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये अवघ्या चार महिन्यांसाठी आ. सावे हे उद्योग राज्यमंत्री राहिले होते. विधानसभेनंतर कॅबिनेट होण्याची त्यांची संधी हुकली होती, ती आता पूर्ण होऊ शकते.

पुणे, कोल्हापूर पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटील?

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या २०१४ ते २०१९ या काळात अनेक खात्यांचे मंत्रिपद सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे आणि कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोल्हापूरच्या या पदासाठी ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे आणि विनय कोरे हे दोघेही प्रबळ दावेदार असताना पाटील यांच्याकडेच त्यांचा गृहजिल्हा देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करीत आहेत.

२०१४ नंतर राज्यातील युती सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे राज्यातील नंबर दोनचे मंत्री होते. त्यांच्याकडे कोल्हापूरसह सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर उमेदीच्या काळात जळगावमध्ये संघटनेच्या कामासाठी झोकून देणाऱ्या पाटील यांच्यावर जळगावच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात आता मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित आहे. तसेच प्रकाश आवाडे, विनय कोरे हे भाजपकडून, तर राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि प्रकाश आबिटकर हे शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठीचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. राजेश क्षीरसागर सध्याच्या पदासाठी पुन्हा आग्रही आहेत. जिल्हाच्या मंत्रिपदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

लाल दिवा भुसे की कांदेंना?

नाशिक : ठाकरे सरकार उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेना बंडखोरांमध्ये जिल्ह्यातील नांदगावचे आमदार सुहास कांदे व मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे लाल दिवा नांदगावला मिळतो की पुन्हा मालेगावलाच, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत सर्वप्रथम जिल्ह्यातून नांदगावचे आमदार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे हे सहभागी झाले होते. त्यानंतर दादा भुसे यांनी शिंदे गटात एन्ट्री केली. दादा भुसे गेल्या साडेसात वर्षापासून मंत्रिपद उपभोगत असल्याने फडणवीस नव्या चेहऱ्याला संधी देतात की ज्येष्ठताक्रमानुसार भुसे यांच्याच गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडते, याकडे लक्ष आहे. कांदे व भुसे या दोन बंडखोरांपैकी कुणाच्या तरी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया


Leave a Comment