पाणीटंचाईचा डाळिंबाच्या बहराला फटका

पुणे : पाणी टंचाईमुळे राज्यातील डाळिंबाचा अंबिया बहर अडचणीत आला आहे. दरवर्षी अंबिया बहरात सरासरी ५० हजार हेक्टरवर फळे घेतली जातात. पाण्याअभावी यंदाच्या अंबिया बहरात जेमतेम २५ हजार हेक्टरवर फळे घेतली जाणार आहेत. उन्हाळाभर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकरी डाळिंबाचे पीक घेणे टाळत आहेत.

अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे म्हणाले, राज्यभरात डाळिंबाचे क्षेत्र २.६५ लाख हेक्टरवर आहे. मृग, हस्त आणि अंबिया बहारात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सध्या बाजारात हस्त बहरातील डाळिंबाची खरेदी- विक्री सुरू असून, हस्त बहार अंतिम टप्प्यात आहे. अंबिया बहरातील फळ छाटण्या (फळ धारणा) साधारण पंधरा डिसेंबरपासून मार्चच्या मध्यापर्यंत होतात. फळांची काढणी जूनपासून ऑगस्टपर्यंत होते.

अंबिया बहरात प्रामुख्याने पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत फळे घेतली जातात. दरवर्षी साधारण ५० हजार हेक्टर फळे घेतली जातात. पण, यंदा पाण्याची मोठी टंचाई जाणवत असल्यामुळे जेमतेम २५ हजार हेक्टरवरच फळ छाटणी घेणे शक्य झाले आहे. अंबिया बहरातील फळ छाटण्या पूर्ण झाल्या आहेत. फळ छाटण्या झालेल्या बागांमध्ये फूल धारणा आणि फळ धारणा सुरू आहे. वाढते तापमान आणि पाणी कमी पडत असल्यामुळे फळ धारणा कमी होऊ लागली आहे. पाणी टंचाई आणि वाढत्या तापमानामुळे फळांचा आकार लहान राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर परिसरात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. तापमान वाढ अशीच होत राहिल्यास इंदापूर, सांगोला आणि सोलापूर परिसरातील डाळिंब पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे.

सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकरी दत्तात्रय येलपले म्हणाले, पुणे, नगर जिल्ह्याच्या तुलनेत सांगोला आणि सोलापूर परिसरात अंबिया बहरात कमी क्षेत्रावर फळे घेतली जातात. सांगोला तालुक्यात सिंचनाची सोय नसलेल्या भागात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. हा हंगाम उन्हाळाभर असतो. तापमान जास्त असल्यामुळे या काळात पाण्याची गरजही जास्त भासते. यंदा डाळिंबाना उन्हाळाभर पाणी पुरेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अंबिया बहारात फळे घेणे टाळून जूनमध्ये मृग बहरात फळे घेण्याचे नियोजन केले आहे.

अंबिया बहरात पाणी कमी पडण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी फळ छाटण्या (फळधारणा) घेणे टाळले आहे. मृग बहारात फळधारणा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पाण्याची टंचाई असल्यामुळे फळधारणा कमी होण्याची आणि फळांचा आकार लहान राहण्याचा अंदाज आहे. – प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ.

वाचा : Nissan Car भारतात घालणार धुमाकूळ, 11 हजार रुपयांमध्ये घेता येणार दमदार कार

Leave a Comment