केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली राज्यांची आढावा बैठक, राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश


Last Updated on December 24, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली: चीनसह इतर देशांमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेऊन कोरोना व्यवस्थापनाचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यावेळी राज्यांना आगामी सण व नववर्षोत्सव पाहता सतर्क राहण्याचा इशारा देत आरोग्य यंत्रणांना सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवून टेस्ट-ट्रॅक-ट्रीट लसीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कच्या वापरासह कोरोना नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. राज्यांच्या कोरोना व्यवस्थापन तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.

यापूर्वी कोरोनाच्या लाटांचा आपण ज्याप्रमाणे सामना केला, त्याचप्रमाणे यंदाही केंद्र व राज्यांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याची गरज आहे, असे , मांडविया म्हणाले. सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी देशातील कोरोना महामारीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देत राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला. कोरोनाविरोधी लढ्यात टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन हेच योग्य धोरण असल्याचे आतापर्यंत तरी स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे राज्यांनी आपली देखरेख यंत्रणा अधिक बळकट करत कोरोना संसर्गावर बारकाईने लक्ष ठेवावे, चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, अधिकाधिक नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात यावे आणि कोरोनाच्या संभावित लाटेचा सामना करण्यासाठी रुग्णालयांसह सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी राज्यांना दिल्या. आगामी सण आणि नववर्षोत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता लसीकरणावर भर देण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास मांडविया यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, पाणी – सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, तीन फूट अंतर राखणे यांसह इतर नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले. या बैठकीनंतर आरोग्य सचिवांनी राज्यांना एक पत्र पाठवून काही दिशानिर्देश जारी केले. कोरोना रुग्ण आणि संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. यासोबतच जिल्हा पातळीवरील रुग्णालयांमध्ये दाखल एन्फ्लुएंजा आणि श्वसनाचे गंभीर आजार असलेल्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी, असे निर्देश राज्यांना देण्यात आले.

हेही वाचा: 3 महिन्यांत ६० टक्के चीन होणार कोरोनाबाधित