Sericulture: ‘शेतीपूरक’ म्हणून रेशीम शेतीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल


Last Updated on November 24, 2022 by Piyush

Silk Farming : एक दशकापासून निसर्गाच्या सुरू असलेल्या लहरीपणामुळे नगदी पिकांचे होणारे नुकसान आणि दिवसेंदिवस वाढलेली मजुरी तसेच मजुरांची टंचाई यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कुलमुडत आहे. याला वैतागून अनेक शेतकरी आता पर्यायी व्यवस्था म्हणून रेशीम शेती(Sericulture) व्यवसायाकडे वळत असून, यासाठी योग्य आणि वेळेत नियोजन करू शकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही शेती फायदेशीर आहे. दस्तापुरातील सहा शेतकऱ्यांनीही यावर्षीपासूनच हा नवा व्यवसाय सुरू केला आहे.

शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय करण्यासाठी पोखरा आणि मनेरागा या योजनेच्या माध्यमातून रेशीम उद्योगासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. अनुदान मोठ्या प्रमाणावर असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आता रेशीम उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत.

यापूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय आणि शेळीपालन मोठ्या प्रमाणावर केले जात होते. परंतु, दुग्धव्यवसायासाठी होणारा खर्च, मेहनत आणि दर याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांनी हा व्यवसाय बंद केला आहे. त्याला पर्याय म्हणून अनेकजण रेशीम शेतीकडे वळताना दिसत आहेत.

लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील सहा शेतकऱ्यांनी यावर्षीपासून हा व्यवसाय सुरू केला आहे. रेशीम शेती सुरू करण्यासाठी एक एकरचे नियोजन केले तर चार ते साडेचार लाख रुपये होतात. शासनाकडून दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यामध्ये कमी दिवसात व कमी वेळेत जास्त मेहनत घेण्यात येत असून, सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळाल्यास उत्तम प्रतीचे रेशीम कोश तयार होतात.

शिवाय, दरही चांगला मिळतो. या उद्योगात हलगर्जीपणा परवडणारा नाही. वेळेत मेहनत करणे शक्य असेल तरच ही रेशीम उद्योग शेती परवडणारी आहे. केवळ अनुदान मिळणार आहे, म्हणून हा व्यवसाय कोणी करू नये, असे येथील शेतकऱ्यांचे मत आहे.

दोन महिन्यांत एक लॉट……

रेशीम शेतीचे योग्य नियोजन केल्यास एक एकरात दोन महिन्यांतून एक लॉट निघतो. या एका लॉटसाठी १०० अंडीपुंज लागतात. त्यात ८० हजार अळ्या असतात. १०० अंडीपुंजसाठी २ हजार ८०० रुपये खर्च होतो. या एका लॉटमधून किमान ६० ते ८० किलो उत्पादन अपेक्षित आहे, असे तज्ज्ञ सांगतात..

कुठे आहे बाजारपेठ ?

रेशीम कोश विक्रीसाठी लातूर, बीड, जालना येथे चांगली बाजारपेठ आहे. परंतु, कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथे चांगल्या मालाला उत्तम दर मिळतो. हे कोश ५०० ते ८०० रुपये किलो दराने तेथे विक्री होतात. दोन महिन्यांतून एक लॉट निघाला तरी यातून खर्च वजा जाता पंधरा ते वीस हजार रुपये निव्वळ नफा हातात पडतो.

रेशीम उद्योग हा व्यवसाय फायदेशीर असला तरी त्यात ‘रिस्क’ही आहे. या व्यवसायात कोणतेही काम अगदी वेळेतच झाले पाहिजे. थोडाही हलगर्जीपणा चालत नाही. उत्पादन वाढीसाठी या व्यवसायात नियोजन आणि वेळ या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. – प्रा. अमर गडदे, दस्तापूर.

वाचा : रिसोड बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली! दरात झाले मोठे बदल