Cotton Price: कापसाची मारामार, व्यापारी दारोदारो..! बाजारपेठ ओस


Last Updated on December 14, 2022 by Piyush

नाशिक : सध्या पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ (Cotton market) ओस पडली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाचे यंदा उत्पादन कमी (Reduced cotton production) झाले. त्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. खरेदी केंद्रावर कापसाची आवक थंडावली आहे.

सुरुवातील निसर्गाने साथ दिल्याने कापसासह अन्य खरीप पिकांची चांगली वाढ झाली, पण नंतर संततधार व अतिवृष्टीच्या पावसामुळे ‘फुलपगड्या’ संपूर्ण गळाल्या, मात्र नवीन पालवी फुटलीच नाही. त्यामुळे कापूस उत्पन्न कमी झाले. मागील वर्षाच्या तुलनेत एका बॅगमागे दीड ते दोन क्विंटल उत्पन्न घटले आहे. कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतामध्ये असलेल्या कापसाच्या वेचणीचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. मात्र, दर कमी मिळत असल्याने कापूस घरात आणि व्यापारी दारात अशी गत झाली आहे.

काटा बंद पडण्याची शक्यता

सध्या कापसाला आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति विचटलपर्यंत भाव मिळत असून शेतकऱ्यांची मनःस्थिती दहा ते बारा हजार भाव मिळाल्यास विकण्याची झालेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आवकच नाही. व्यापारीही आता गावागावांत जाऊन कापसाचा शोध घेत असून, शेतकरीही प्रतिसाद देत नसल्याने या व्यापायांचा काटा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यापारी गावोगावी

दसऱ्यापासून फुलणारी पांढऱ्या सोन्याची बाजारपेठ अडीच ते तीन महिने होऊनही थंडावली आहे. देशभरातून आतापर्यंत फक्त दहा ते बारा टक्के कापूस विक्रीस आलेला असल्याचे कापूस खरेदी केंद्रावरील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली असून शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा असल्याने खेडा खरेदीलाही प्रतिसाद नाही. व्यापारी कापसाकरिता गावोगावी जात असून, त्यांनाही शेतकरी कापूस देत नसल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

दर वाढत नसल्याने चिंता

आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांच्या तुलनेत भारतीय कापसाची किंमत उंच असून दहा ते बारा हजार रुपये बेल्स (गठान) मिळत आहे. त्यामुळे निर्यातीला चालना मिळत नाही.
आजघडीला सेंटचा दर ७९ ते ८५ दरम्यान दोलायमान असल्याने निर्यातदारांनाही अचूक अंदाज येत नसल्याचे व्यापायांनी सांगितले असून कापूस बाजारपेठ विश्लेषकही संभ्रमात असल्याचे सांगितले आहे. भाववाढ होत नसल्याने कापूस विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

१५ ते २० क्विंटल संकलन

सद्य:स्थितीत मालेगाव तालुक्यात कापूस संकलन केंद्रांवर दररोज १५ ते २० क्विटल कापूस जमा होत आहे. मालेगावातील कापूस प्रामुख्याने गुजरात व मध्य प्रदेशमध्ये विक्रीस जात असतो, मात्र सध्या गुजरातमधील कापूस मागणी मंदावली असल्याचे समजते आहे. मालेगाव तालुक्यात जवळपास ४० ते ५० कापूस खरेदी केंद्रे /संकलन केंद्रे आहेत. येथील उत्पादन मुख्यतः विक्रीसाठी गुजरात व मध्य प्रदेशमध्ये पाठवले जाते. मात्र सध्या गुजरातमधील कापूस मागणी मंदावली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा निश्चित अचूक अंदाज विश्लेषकांना येत नसल्याने निश्चित भाववाढ कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकरी कापूस विकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मात्र शेतकऱ्यांनी टप्प्याटप्याने माल विकण्यास सुरुवात केल्यास योग्य भाव मिळेल. कापूस माल बाजारात आल्यास भाववाढ होऊ शकते. – नितीन शिंदे, संचालक, स्वामी कॉटन खरेदी केंद्र, चिखल ओहोळ.

वाचा : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा मोर्चा, सत्याग्रह आंदोलन