शेतकरी, खेळांना प्रोत्साहन देणे ही देशसेवाच! पंतप्रधान मोदींचा भाजप खासदारांना कानमंत्र


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली : चांगल्या आरोग्यासाठी देशातील छोट्या शेतकऱ्यांद्वारे केले जाणारे बाजरी उत्पादन आणि खेळांना प्रोत्साहन देणे, ही एकप्रकारची देशसेवाच आहे, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भाजपच्या खासदारांना दिला. देशातील ८५ टक्क्यांहून अधिक सीमांत शेतकरी बाजरीचे पीक घेतात. त्यामुळे बाजरीला चांगला बाजारभाव मिळाल्यास त्यांना निश्चितपणे आर्थिक लाभ होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

केंद्रातील सत्तारूढ भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भारत सरकारच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे बाजरी धान्य आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे. बाजरीयुक्त भोजन हा एक लोकप्रिय पर्याय बनवण्याचे आवाहन भारताने केले आहे. आगामी जी – २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्याने हजारो विदेशी प्रतिनिधी देशात येणार आहेत.

त्यांना बाजरीपासून बनलेले भोजन व खाद्यपदार्थ देण्यात येतील. यासोबतच देशातील लाखो अंगणवाड्या, शाळा, घरे व शासकीय बैठकांच्या मेजवानीत असे पदार्थ समाविष्ट केले जाऊ शकतात. खासदारसुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत बाजरीचे पदार्थ भोजनात देतील. या माध्यमातून बाजरीला प्रोत्साहन देता येऊ शकते, असे मोदींनी निक्षून सांगितले. सीमांत शेतकऱ्यांच्या श्रेणीत मोडणारे सुमारे ८५ टक्क्यांहून अधिक शेतकरी बाजरीचे पीक घेतात. त्यामुळे बाजरीला चांगला बाजारभाव मिळाल्याने त्यांना आर्थिक लाभ होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. याचवेळी कबड्डीसारख्या भारतीय खेळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: १३७ वर्षांपूर्वीच्या कायद्यासह ६० जुने कायदे रद्द होणार