नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटातील प्रियांशू क्षत्रियला चोरीच्या आरोपात अटक, यापूर्वीही मोबाईल चोरीप्रकरणी गेला आहे तुरुंगात


Last Updated on November 25, 2022 by Ajay

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘झुंड’ () या चित्रपटात काम केलेल्या 18 वर्षीय प्रियांशू क्षत्रियला (Priyanshu Kshatriya) नागपूर शहर पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. प्रियांशूवर दागिने आणि लाखांची चोरी केल्याचा आरोप आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मानकापूर भागात राहणारे ६४ वर्षीय प्रदीप मांडवे यांनी घरातून पाच लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला पकडले ज्याने या चोरीत प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचे उघड केले, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

प्रियांशू क्षत्रिय याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रियांशूला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गड्डी गोडाऊन परिसरातून चोरीचा माल जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’मध्येही ज्या भागातून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे ते दाखवण्यात आले आहे.

प्रियांशूला यापूर्वीही ट्रेनमधील प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 2021 मध्ये नागपूर रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक केली होती, ज्यामध्ये प्रियांशूचे नाव देखील होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 14 मोबाईल जप्त केले आहेत. हेही वाचा: २६ वर्षांपूर्वी पंजाबात हरवलेल्या तानाजींना सापडलं सांगोल्यातील स्वत:चं गाव