पालघर: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार


Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

पालघर : पालघर तालुक्यातील माहिम परिसरात पाणेरीनजीक एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. हा प्रकार पीडितेच्या मित्रानेच घडवल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. या धक्कादायक प्रकाराने पालघर जिल्हा हादरला असून पोलिसांनी याप्रकरणी आठ संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २२ डिसेंबरपर्यंत पोलीस(Police) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अटकेत असणाऱ्यांनी पीडितेला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. या प्रकाराने पीडितेने माहिम पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती देत. संबंधित तरुणांच्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील सर्वजण पालघर तालुक्यातील रहिवासी आहेत. यातील बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मित्राने बोलवल्यानंतर पीडिता त्याच्यासोबत स्वेच्छेने गेल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेची मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सातपाटी पोलीस करत आहेत.

हेही वाचा: सायबर हल्ले : रोज १५०० घटना!