१५ वर्षांपासून रजेवर, तरीही हवी पगारवाढ! कर्मचाऱ्याने केली कंपनीवर केस


मराठी बातम्या न्यूज : नोकरी आणि नोकरीतला पगार, हा जगातल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांसाठी एक कळीचा मुद्दा असतो. आपण कर्मचाऱ्यांना पुरेसा, योग्य, काहींना तर क्षमतेपेक्षा जास्त पगार देतो, असं अनेक कंपन्यांना वाटत असतं. तर कंपनी आपल्याला राबवून घेते, आपण जेवढं काम करतो, त्यापेक्षा आपल्याला खूपच कमी पगार मिळतो, असं बहुसंख्य कर्मचाऱ्यांना वाटत असतं.

कोरोनाकाळात आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांची याबाबतची ओरड खूपच वाढली. कारण, या काळात अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, अनेकांचे कमी करण्यात आले आणि अनेकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त कामही करवून घेतलं गेलं…

ब्रिटनमधली एक घटना मात्र याला अपवाद ठरावी. इयान क्लिफोर्ड हा इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक कर्मचारी. जगभरात नामांकित अशा ‘आयबीएम’ या कंपनीचा तो कर्मचारी आहे. या कंपनीत सुरुवातीला काही वर्ष त्यानं काम केलं; पण नंतर आजारपणामुळे त्याला आपलं काम व्यवस्थित करता येईना. कामावर बऱ्याच दांड्याही पडायला लागल्या. कोणत्याही कर्मचाऱ्याला आजारपणामुळे, त्याच्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे त्याला काढून टाकावं लागू नये, यासाठी कंपनीनं इयानला आपली तत्कालीन ‘आयबीएम हेल्थ पॉलिसी’ देऊ केली.

ही योजना सर्वस्वी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठीच होती. कंपनीनं इयानला सांगितलं, तुला कामावर येता येत नाही, काहीही काम करता येत नाही ना, तरीही आम्ही तुला कामावर ठेवतो. काहीही काम न करताही तू आमचा कर्मचारीच राहशील. आजपासून तू कामावर आला नाहीस तरी चालेल, कवडीचं काम केलं नाही तरी चालेल, तरीदेखील तुला आत्ता जेवढा पगार मिळतो, त्या पगाराच्या ७५ टक्के रक्कम तुला मिळेल. म्हणजे तुझ्या पगारातली फक्त २५ रक्कमच कापली जाईल. शिवाय हा पगार किती काळ मिळेल? तर तू आजारातून बरा होईपर्यंत, वयाच्या ६५ वर्षापर्यंत म्हणजेच रिटायर होईपर्यंत किंवा दुर्दैवानं त्याआधीच तुझा मृत्यू झाला, तर यापैकी जे आधी होईल तिथपर्यंत, म्हणजेच रिटायरमेंटचा विचार केला, तर साधारण ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ त्याला ‘बसून’ पगार मिळणार होता!

आजारपण किंवा अपंगत्वाच्या कारणावरून २००८मध्ये कंपनीनं ही सुविधा इयानला देऊ केली. जेव्हा या सुविधेचा लाभ इयानला मिळाला, त्या दिवसापासून तर आजपर्यंत “आजारपणाच्या रजेवर (सिक लिव्हवर) आहे. तेव्हापासून एकही दिवस तो कामावर गेलेला नाही. घरी बसून पगार घेतो आहे. तो ज्यावेळी प्रत्यक्ष कामावर जात होता, त्यावेळी त्याला पगार होता, वार्षिक ७२,०३७ पाऊंड्सा २०१३ ला इयानला ‘आयबीएन हेल्थ पॉलिसी’ लागू केल्यानंतर त्याचा पगार झाला ५४,०२८ पाऊंड्स! (साधारण ५६ लाख रुपये!) २००८ ते २०१३ या काळात आजारपणात आणि अनियमित कामावर येत असूनही त्याला जवळपास पूर्ण पगार दिला जात होता!

इयान गेली १५ वर्षे सिक लिव्हवर असूनही त्याला पगार मिळतो आहे. तरीही या पट्ट्यानं काय करावं? गेल्या वर्षी त्यानं कंपनीला चक्क कोर्टात खेचलं आणि दावा केला की, कंपनीनं माझ्यावर अन्याय केला आहे. माझ्याबाबतीत भेदभाव केला आहे. गेल्या १५ वर्षांत कंपनीनं माझा पगार एक रुपयानंही वाढवलेला नाही! तात्पर्य, जेव्हापासून मी सिक लिव्हवर आहे, तेव्हापासून कंपनीनं मला पगारवाढीचा फरक द्यावा! याशिवाय इयानचं म्हणणं आहे. कंपनीनं मला जो हेल्थ प्लॅन दिला, तोच मुळात अन्यायकारक आहे. त्यात महागाईभत्याचाही विचार केलेला नाही. मी जेव्हा रिटायर होईल, तोपर्यंत तर महागाई आणखीच वाढलेली असेल. मग, मी जगायचं तरी कसं?..

यावर कंपनीनंही आपलं म्हणणं मांडलं. कंपनीचं म्हणणं होतं, इयानला जी योजना आम्ही दिली. ती खरंतर मानवतेच्या कारणानं दिली होती. कर्मचारी जर कामच करीत नसेल, त्याचा कंपनीला काही उपयोगच नसेल, तर अशा कर्मचान्याला पगार देणं बंधनकारक नाही. त्याच वेळी त्याचा पगार बंद केला असता किंवा त्याला कामावरून कमी केलं असतं, तर इयानला आत्तापर्यंत जे काही मिळालं आणि पुढेही मिळणार आहे, त्यातला एक छदामही नसता!

निष्क्रिय कर्मचाऱ्यांना कसली पगारवाढ?

कंपनीचं हे म्हणणं उचलून धरलं आणि इयानवर ताशेरे ओढले. न्यायाधीश हुसेगो यांनी निकालात म्हटलं आहे, जे कर्मचारी प्रत्यक्ष काम करतात, त्यांच्याच पगारात वाढ होऊ शकते. निष्क्रिय कर्मचाऱ्याना कसली पगारवाढ? कंपनीन इयानला कामावर ठेवलं, हे त्यांचे इयानवर उपकारच आहेत! समजा इयानला सध्या जो पगार मिळतोय. त्याची किमत ३० वर्षात अर्धी जरी तरी त्याला मिळालेला लाभ हा खूप मोठाच आहे!

वाचा : रिचर्ड ओपोकूच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं रहस्य


Piyush Kakulate is a senior Editor with two years of experience in journalism. He is a seasoned journalist with a wealth of knowledge and expertise in his field. Piyush is known for his sharp analytical skills and his ability to break down complex issues into simple terms. He has a keen interest in politics, business, and technology, and is always on the lookout for breaking news in these areas.