आता तर वीजनिर्मितीतून कमाई करण्याची वेळ – पंतप्रधान मोदी


Last Updated on November 25, 2022 by Vaibhav

मोडासा / पालनपूर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेस व ‘आप’च्या सत्ता आल्यास मोफत बीज देण्याच्या आश्वासनावर कडाडून हल्ला चढवला. आता मोफत वीज घेण्याऐवजी जनतेनेच सौर पॅनलच्या माध्यमातून वीजनिर्मिती करीत पैसा कमावण्याची वेळ असल्याचे मोदी म्हणाले. तसेच ‘आप’कडून ‘दिल्ली मॉडेल’चा गाजावाजा केला. जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी राज्यातील भाजप सरकारने गुजरातमधील शिक्षण क्षेत्राचा कायापालट करून ते वैज्ञानिक व आधुनिक केल्याचे म्हटले. तर ही निवडणूक गुजरातच्या आगामी २५ वर्षांचे भवितव्य निश्चित करण्यासाठी असल्याचे प्रतिपादन करत मोदींनी पुन्हा भाजपला सत्ता देण्याचे आवाहन लोकांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरवली जिल्ह्यातील मोदासा, बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर, गांधीनगरमधील देहगाम आणि अहमदाबादमधील बालवामध्ये झंझावाती प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस व आपवर चौफेर टीका केली. कॉंग्रेसचा विश्वास हा ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणावर असून त्यांना सत्तेशिवाय दुसरे काहीही पडले नाही. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने गांधी विचारांचा अवलंब केला नाही. त्यांनी गावांकडे घोर दुर्लक्ष केल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर राज्यात सत्ता आल्यास मोफत वीज देण्यासंबंधीच्या काँग्रेस व आपच्या आश्वासनावरदेखील त्यांनी टीकास्त्र डागले. आता वीज मोफत मिळवण्याऐवजी त्यातून उत्पन्न कमावण्याची वेळ आली आहे. सोलर रूफटॉपमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज सरकारला विकून त्यातून पैसा कमावता येतो. मेहसाना जिल्ह्यातील संपूर्ण मोढेरा गाव अशा पद्धतीने कमाई करत आहे. हीच प्रणाली मला संपूर्ण गुजरातमध्ये राबवायची आहे. ही कला फक्त मला माहिती असल्याचे मोदी म्हणाले. याचबरोबर ही निवडणूक गुजरातच्या भविष्याशी निगडित आहे.राज्याला विकसित देशांच्या श्रेणीत

उभे करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. ही निवडणूक कोण आमदार बनेल, कोणाची सत्ता बनेल यासाठी नाही तर गुजरातचे २५ वर्षांचे भविष्य निश्चित करण्यासाठी आहे, असे मोदी म्हणाले.तसेच राज्यातील भाजप सरकारने आतापर्यंत भरपूर कामे केल्याचा दावा करत त्यांनी आता मोठी उडी मारण्यासाठी मजबूत सरकार बनवण्याची गरज व्यक्त केली. तर आपकडून प्रचारात शिक्षण क्षेत्रावर दिला जात असलेला भर लक्षात घेत मोदींनीदेखील राज्यातील भाजप सरकारने शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला असल्याचा दावा केला. जवळपास २० ते २५ वर्षांपूर्वी राज्यात शिक्षणासाठी फक्त १६०० कोटींची तरतूद केली जात होती. आता ही तरतूद ३३ हजार कोटींवर पोहोचली असून इतर राज्यांच्या तुलनेत ती खूप अधिक आहे. भाजप सरकारने राज्यातील शिक्षण क्षेत्रात कायापालट करत ते वैज्ञानिक व आधुनिक केल्याचे म्हटले. हेही वाचा: समान नागरी कायदा लागू करण्यास भाजप कटिबद्ध – शाह