Last Updated on December 27, 2022 by Vaibhav
नवी मुंबई: चीन, जपान व दक्षिण कोरिया या देशांसह ९१ देशांत कोरोनाच्या नवीन प्रकाराने हैदोस घातला आहे. त्यामुळे केंद्र, राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यातच काही राज्यांत कोरोनाच्या नवीन प्रकारातील संसर्गित रुग्ण आढळल्याने नवी मुंबईमधील नागरिक चांगलेच हादरले आहेत. नवी मुंबईकरांमध्ये सध्या कोरोनाची भीती, दहशतीचे सावट पसरले असून जर पूर्वीसारखी परिस्थिती आली तर आपण जगायचे कसे, या विचाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.
नवी मुंबई शहरात १५ मार्च २०२० नंतर कोरोना संसर्गाने हैदोस घातला होता. यामुळे सलग दोन वर्षांत २०५७ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, धंदे व नोकऱ्यांवर गदा आली. त्यानंतर परिस्थिती सुधारली व २०२२ पासून परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली. आता सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच पुन्हा काही देशात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने आता आपले काय होणार, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.
कोरोनाचा बीएफ-७ व्हेरियंट (उपप्रकार) भारतासह विविध देशात पसरला आहे. हा ओमायक्रॉनचा सर्वात शक्तिशाली व्हेरियंट आहे. यावर अँटीबॉडीचा काहीही प्रभाव पडत नाही. त्यामुळे चीनसारख्या देशात मागील वीस दिवसांत २४ कोटी ८० लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तसेच भारतातील ओडिशा व गुजरात राज्यात या कोरोनाच्या या नवीन उपप्रकाराचा संसर्ग झालेले चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील दैनंदिन उद्योग, व्यवसाय करणाऱ्या घटकांची झोप उडाली आहे.
नवी मुंबई पालिकेचे प्रभारी आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील या परिस्थितीवर मात करण्यासाठी सतर्कता दाखवत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच ऐरोली, वाशी, नेरूळसारख्या सार्वजनिक रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या सर्वच अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे संसर्ग झालेला रुग्ण तत्काळ दृष्टिपथात येण्यास चालना मिळणार आहे.
कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत त्रिसूत्री अवलंबावी, जेणेकरून या कोरोनाच्या उपप्रकाराचा आपल्याला संसर्ग होणार नाही. -अभिजीत बांगर, आयुक्त, पालिका
हेही वाचा: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली मंजुरी