Cotton Rate: कापूस दर घटल्याने बाजारातील आवक घसरली


Last Updated on November 24, 2022 by Piyush

नंदुरबार : बाजार समितीच्या पळाशी येथील खरेदी केंद्रावर कापसाचे दर (Cotton Rate) खाली आल्याने आवकही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे असल्याने या ठिकाणी शेतकरी कापूस विक्रीसाठी आणण्यासाठी उत्सुक होते. परंतु सोमवारपासून हे दर ९ हजारांच्या आत आल्याने शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

गेल्या आठवड्यात पळाशी येथील खरेदी केंद्रावर दर दिवशी सुमारे दोन हजार क्विंटलपर्यंत कापूस खरेदी करण्यात येत होती. यातून दर दिवशी १०० किंवा त्यापेक्षा अधिक वाहनातून कापूस विक्रीसाठी आणला जात होता. परंतु सोमवारपासून दर प्रतिक्विंटल ८ हजार ७४० रुपयांपर्यंत आले होते.

या दरांमध्ये १०० ते २०० रुपयांची चढ- उतार सुरू आहे. यातून बुधवारी दरांमध्ये काही अंशी पुन्हा घट झाली. कमीत कमी ८ हजार ५५० ते जास्तीत ८ हजार ९९० रुपये प्रतिक्विंटल कापसाचे दर असतानाही शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरवली होती. अपेक्षित असे दर भेटत नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्रात हजेरी लावणे टाळले असल्याचे सांगण्यात येत आहे.

यंदा खरेदी केंद्र उशिराने सुरू झाल्यानंतर कापूस आवक वाढून डिसेंबर उजाडेपर्यंत किमान १५ हजार क्विंटल कापूस खरेदी होण्याची चिन्हे होती. परंतु आजअखेरीस ८ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असल्याची माहिती देण्यात येत आहे. कापूस खरेदी केंद्रात येत्या काळात आणखी भाव कमी झाल्यास व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापूस आणि सरकीचे दर कमी होऊन कापूस गाठींना मागणीही कमी आहे.

येत्या काळात दरवाढ !

राष्ट्रीय बाजारपेठेत विदर्भ, आंध्रप्रदेश आणि गुजरातच्या मालाला अधिक पसंती असल्याने तेथील कापूस खरेदीत वाढ झाली आहे. परिणामी इतर भागातील कापसाचे दर कमी होत आहेत. येत्या काळात राष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्यानंतर पुन्हा दरवाढीचे संकेत आहेत.

वाचा : संत्रा उत्पादक शेतकरी फळ पीकविम्यावर बहिष्कार टाकणार