सुलतानपूर परिसरात लम्पीचा जोर


Last Updated on December 20, 2022 by Vaibhav

सुलतानपूर : पशूवैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहात असल्याने सुलतानपूर येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात लम्पीबाधित जनावरांवर उपचार करताना अडचण येत आहेत. पशूपालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सुलतानपूर खुलताबाद तालुक्यातील मोठं नावाजलेलं गाव आहे. येथे श्रेणी -१ चा सुसज्ज असा पशुवैद्यकीय आहे.

या दवाखान्यातंर्गत परिसरातील तेरा गावाचा समावेश होतो. पशुपालक जनावरांच्या उपचारासाठी पशुयोजना किंवा इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलतानपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात येतात. मात्र येथे पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने परिचरच जनावरांवर उपचार करत आहे. यामुळे योग्य उपचाराअभावी जनावरे दगावण्याची भीती आहे. यामुळे काही पशुपालक अधिक पैसे खर्च करुन खासगी डॉक्टरांची मदत घेतात.

सुलतानपूर पशूवैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच दोन परिचर असे चार पदे केवळ कागदोपत्री आहेत. काही महिन्यांपासून परिचरच जनावरांवर उपचार करत आहे. दरम्यान येथील पशुधन विकास अधिकारी डी.पी. देशमुख यांची अन्य ठिकाणी प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याने सहाय्यक पशुधन विकास अधिकारी सविता रगडे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्या दवाखान्यात हजरच नसतात असा आरोप पशुपालकांचा आहे. या संदर्भात विचारपुस करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त यांच्याशी मोबाईवरून संपर्क साधला असता त्यांनी मी मिटींगमध्ये असल्याचा संदेश पाठवला.

पाच दगावली

सुलतानपूर पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत ३५ जनावरां लम्पीची बाधा झाली आहे. या आजाराने महिन्याभरात पाच जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबधीत विभागाने लम्पीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सक्रीय करण्याची मागणी पशूपालकांतून होत आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांकडून बैलाचाही होतो दशक्रिया विधी