वर्ष अखेरीस म्हाडा सोडत, सर्वसामान्यांना नव्या वर्षात मिळणार गृहभेट


Last Updated on November 24, 2022 by Vaibhav

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळांतर्गत ४ हजार घरांच्या सोडतीची जाहिरात डिसेंबर महिन्यात, तर घरांची सोडत नवीन वर्षांत काढण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापैकी १२०० घरे निश्चित असून उर्वरित घरांची चाचपणी अजूनही सुरू आहे. मागील वर्षभरापासून कोकण मंडळातील घरांसह २० टक्के खासगी विकासक व पंतप्रधान आवास योजनेतील घरांची चाचपणी केल्यानंतर सोडत काढण्यात येणार आहे. यापूर्वी म्हाडाने जून महिन्यात सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र घरांची संख्या, सोडतीचे सॉफ्टवेअर अद्ययावत करण आणि राजकीय सत्तांतर यामुळे जून महिन्यात काढण्यात येणारी सोडत डिसेंबरमध्ये काढण्याचा मुहूर्त म्हाडाला मिळाला आहे.

यंदा पहिल्यांदाच नव्या अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीमुळे अजदारांची पात्रता निश्चिती प्राधान्याने करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनाच सोडतीत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे सोडत पार पडल्यानंतर यशस्वी अर्जदाराला घराची ताबा प्रक्रिया पार पाडता येणार आहे. यापूर्वी सोडत पार पडल्यानंतर प्रथम सूचना पत्र मिळेपर्यंत ३ ते ४ महिन्यांचा कालावधी जात होता. यंदा मात्र घराचा ताबा एका वर्षांच्या आत देण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यरत राहणार आहे. यंदा सोडतीचा अर्ज सादर करतानाच म्हाडा घरांसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत.

म्हाडा कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीत शिरढोण, पालघर येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांसह कोकण मंडळाच्या विरार येथील ४ हजार घरांची सोडत डिसेंबर महिन्याच्या अखेरीस काढण्यात येणार आहे. म्हाडाचे स्वतःच्या भूखंडावर तसेच सहकारी, खासगी भागीदारी तत्त्वावर अर्थात पीपीपी अंतर्गत प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये पीपीपीवगळता २८ हजार ७३७ अत्यल्प व ८८ अल्प घरांचे काम वेगाने सुरू आहे. येत्या काळात या सोडत निवण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या काकण मंडळाच्या माध्यमातून ४४ हजार घरांची उभारणी असून बहुतांशी प्रकल्पांत गृहखरेदीदारांना डायरेक्ट क्रेडिट लिंक सबसिडी देण्य येत आहे.

यापूर्वी म्हाडाच्या माध्यमातू पीएमएवाय योजनेंतर्गत भंडाली गोठेघर या विभागातील घरांसाठी १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून येत्या काळात शिरढोण, पालघर येथील घरांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पीएमएवाय योजनेसह कोकण मंडळांतर्गत वसई, विरार, मीरा-भाईंदर, ठाणे येथील घरांचाही समावेश डिसेंबर महिन्याच्या सोडतीत काढण्यात येणार आहे. जानेवारी २०२३ मध्ये सोडत काढण्याचे नियोजन म्हाडा कोकण मंडळाकडून करण्यात येत आहे.

म्हाडा कोकण मंडळाच्या माध्यमातून १४ ऑक्टोबर २०२१ रोजी ८९८४ घरांची सोडत काढण्यात आली होती. मेट्रो सेवा, कार्यालयीन व निवासी क्षेत्राचा विस्तार, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातही सर्वसामान्य अधिक प्रतिसाद देत असल्यानेच जवळपास २ लाख ४६ हजार अर्जदारांनी घरांसाठी अर्ज दाखल केले होते. यंदाही अत्यल्प व अल्प गटातील वर्ग वगळता मध्यम व उच्च उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत वाढ झाल्याने म्हाडालाही सोडतीचा लाभ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा: नवी मुंबईत पहिला सायबर इंटेलिजन्स प्रकल्प!