सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच! लातूर बाजार समितीत दरात झाले मोठे बदल


Last Updated on December 17, 2022 by Piyush

लातूर : येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी १० हजार ४६६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला ६ हजार रुपयांचा कमाल, ५२०० किमान तर ५५७० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, सध्या सोयाबीनची आवक वधारली असली तरी दरात घसरण सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

बाजार समितीत शुक्रवारी गूळ ६१६६ क्विंटल, गहू ३९४, ज्वारी २, रब्बी ज्वारी ११२, पिवळी ज्वारी ७, मका १०५, तूर ८६, हरभरा ४९६, मूग ६६. उडीद ३६६ तर करडईची १६ क्विंटलची आवक झाली. गुळाला ३ हजार, गहू ३२००, रब्बी ज्वारी ३६००, मका २४००, हरभरा ४५००, तूर ७२४०, मूग ६७००, उडीदाला ६५०० तर करडईला ५३६० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वधारतील या आशेने शेतकऱ्यांनी खरिपातील सोयाबीन घरीच साठवन ठेवले होते, मात्र आता आर्थिक अडचणीमुळे काही शेतकरी शेतमालाची विक्री करीत असले तरी दर मात्र घसरलेलेच आहेत.

दरवाढीच्या अपेक्षेने घरीच साठवणूक….

सोयाबीनचे दर वधारतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात घडामोडी घडल्यासच सोयाबीनचे दर वधारतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

दरम्यान, सध्या ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण आहे तेच सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणत असल्याचे बाजारातील चित्र आहे.

सध्या सोयाबीनच्या दरामध्ये चढउतार आहे. प्रती क्विटल सोयाबीन ५ हजार ५०० ते ५ हजार ५७० या दरम्यान लटकले आहे.

शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला आणले नाही. ज्यांनी आणले त्यांना दर कमी मिळत आहे.

यंदा वेळेवर पेरणी झाली होती. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादनही अधिक होईल अशी अपेक्षा होती. मात्र अतिवृष्टी आणि पुरामुळे सोयाबीनचे नुकसान झाले. उत्पन्नामध्ये घट झाली. यातून लागवड खर्चही निघाला नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. – अंबादास चिखले.
नोकरीच्या मागे न लागता तरुणाने बारमाही शेतीवर लक्ष केले केंद्रीत