ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण जरी कमी असले तरी.. ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांवर मात्र आयसीयुमध्ये जाण्याची वेळ आली आहे. आजच्या तारखेला आयसीयुमध्ये दाखल असलेल्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण असे आहेत कि ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर उर्वरित रुग्ण हे इतर आजारांनी ग्रस्त असून काही रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत. एकही डोस घेतलेल्या नागरिकांना लक्षणे अधिक जाणवत असून अशा नागरिकांनाच आयसीयुमध्ये दाखल करावे लागत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि विशेष करून दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणाच कामाला लागली होती. आयसीयु तसेच जनरल बेड्स देखील यावेळी कमी पडू लागले होते. त्यावेळी लस घेण्याचे प्रमाण देखील अत्यल्प होते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जरी रुग्णसंख्या जरी झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. ही जरी समाधानाची बाब असली तरी, लस न घेण्याच्या प्रवृत्तीमुळे मात्र आयसीयुमध्ये नागरिकांना भरती करण्याची वेळ येत असल्याचे आता उघड झाले आहे.
ठाण्यात आजच्या घडीला ५७ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहेत. यापैकी २४ रुग्ण असे आहेत कि ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. एकही डोस न घेतल्यामुळे अशा नागरिकांना अधिक लक्षणे जाणवत असल्याने त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्याची वेळ आली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. याशिवाय आयसीयुत दाखल असलेल्या ४ रुग्णांनी केवळ एकच डोस घेतला असून उर्वरित २७ रुग्णांनी मात्र लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असून केवळ १५ टक्के लसीकरण शिल्लक आहे. एकूण २५ लाख ३६ हजार ३५९ नागरिक ठाणे शहरात लसावंत झाले असून यामध्ये १४ लाख ४० हजार ७७३ जणांना पहिला डोस तर १० लाख ९५ हजार ५८६ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आयसीयुमध्ये दाखल असलेले मात्र दोन्ही डोस घेतलेल्या रुग्णांची प्रकृती मात्र स्थिर असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. इतर आजार असलेले आणि ज्यांचे वय ६५ च्या पुढे आहे अशा नागरिकांची देखील विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ आणि २६ वयोगटातील तरुणही आयसीयूत
लसीचा एकही डोस न घेणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तरुणवर्गाला देखील आला आहे. पार्किंग प्लाझा या ठिकाणी आयसीयुमध्ये एक १८ वर्षीय तर एक २६ वर्षीय तरुणांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या या रुग्णालयात उपचार सुरु असून लस न घेतल्यामुळे तरुणांना देखील आयसीयुचे तोंड बघावे लागत असल्याचे हे ज्वलंत उदाहरण असून किमान आता तरी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
एकही डोस न घेतलेल्यांची संख्या २ लाखांवर
ठाणे शहरात जवळपास ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाले असले तरी अजूनही काही नागरिक लस घेण्याबाबत गंभीर नसल्याने एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या ही तब्बल २ लाखांवर आहे. एकही डोस न घेतल्यामुळे नागरिकांवर आयसीयुमध्ये जाण्याची वेळ येत असल्याने अशा नागरिकांनी त्वरित लस घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तिसऱ्या लाटेचा कहर तीव्र, आढळले अडीच लाख नवीन रुग्ण; 6 दिवसात 150% वाढ