परदेशातून भारतात बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ


Last Updated on January 3, 2023 by Vaibhav

मुंबई : गेल्या पाच वर्षांत भारतात बारएट्रिक(Bariatric) शस्त्रक्रियेमध्ये तीन पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शस्त्रक्रियांमधील वाढ ही केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरील लठ्ठपणा आजार वाढल्याचे संकेत आहेत. लॉकडाऊननंतर सौदी, येमेन, सीरिया, आफ्रिका, दुबई, यूएस आणि यूकेसारख्या देशातून आंतरराष्ट्रीय रुग्ण वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी मध्य भारतात आले आहेत.

यामध्ये १८-६५ वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. इष्टतम वजन राखण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. जेव्हा आहार आणि व्यायामासारखे पर्याय अयशस्वी होतात तेव्हा वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया वरदान ठरतात.

आहार आणि व्यायामातील बदलांमुळे वजन कमी होऊ शकते, परंतु त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोक त्यांचे वजन भविष्यातही नियंत्रित करण्यात अयशस्वी ठरतात. लठ्ठपणाने ग्रासलेल्या व्यक्तींची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ३० पेक्षा जास्त बीएमआय असलेल्या कोणत्याही कोमॉर्बिडीटीसह किंवा त्याशिवाय कोणीही बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करू शकतो.

लठ्ठपणासह इतर व्याधींमध्ये टाइप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, डिस्लिपिडेमिया, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस), हायपोथायरॉइडिझम, स्लीप अॅप्नीया यांचा समावेश आहे. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय रुग्णांमध्येही ही शस्त्रक्रिया खूप लोकप्रिय ठरत आहे. याबाबत मुख्य बॅरिएट्रिक सर्जन डॉ. मनीष मोटवानी यांनी सांगितले की, बैठकीची जीवनशैली ही या लठ्ठपणाचे मूळ कारण ठरत आहे.

२०१७ च्या तुलनेत बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया निवडणाऱ्या लोकांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे.अतिरिक्त वजन, उच्च रक्तदाब, गुडघेदुखी आणि मधुमेहाने ग्रासलेले तरुण रुग्णही आपण पाहतो. याबाबत उपचारासाठी भेट देणाऱ्यांची संख्या १८ ते ६५ वयोगटातील ३०.४ टक्के झाली आहे. साथीच्या आजारादरम्यान, असा अंदाज होता की, हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोविड रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्ण लठ्ठ किंवा जास्त वजनाचे होते.

वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया सुरक्षित आणि परिणामकारक आहेत आणि तुम्हाला फक्त चांगले दिसण्यासाठीच नाही तर सर्व कोमॉर्बिडिटीज व्यवस्थापित करण्यात देखील मदत करतात…तसेच बॅरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे म्हणाले की, ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया वरदान ठरू शकते. ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पद्धतीने केली जात असल्याने रुग्णाला वेदना होत नाहीत.

लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये गॅस्ट्रिक पाऊच तयार करणे समाविष्ट असते आणि गंभीरपणे लठ्ठ असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणीय आणि दीर्घकाळ टिकणारे वजन कमी करण्यासाठी केले जाते. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचा दर अंदाजे ८०- ९० टक्के आहे. पूर्वी ही शस्त्रक्रिया करायला लोक घाबरायचे. पण लॉकडाऊननंतर अनेक लोक ही शस्त्रक्रिया करताना दिसून येत आहे. समाजात बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेबाबत असलेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी आणि हृदयविकार यासारख्या लठ्ठपणाशी संबंधित सर्व समस्यांवर बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया फायदेशीर ठरते. लठ्ठपणा हे विविध आजारांचे प्रमुख कारण आहे. मात्र या शस्त्रक्रियेमुळे आपण रोगाचे मूळ कारण नष्ट करत आहोत. जर एखाद्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया झाली असेल तर याचा अर्थ असा नाही की, तो आता त्याला पाहिजे ते खाऊ शकतो. बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर लगेच वजन कमी होत नाही. यासाठी रुग्णाने नियमित पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: भारतीय बनावटीच्या कफ सिरपचे उझबेकिस्तानात १८ बळी!