Silk Farming: कमी खर्चात अधिक उत्पन्न घ्यायचंय? तर अशी करा रेशीम शेती


Last Updated on December 12, 2022 by Piyush

Silk Farming : रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे, पोकरा योजनेतही रेशीम शेतीचा समावेश करण्यात आला आहे. आठ ते दहा महिने सिंचनाची सोय असेल तर शासकीय योजना या शेतीसाठी लागू असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, महारेशीम शेती अभियान सुरू असून, त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी आवश्यक आहे. हरंगुळ येथील अतिरिक्त एमआयडीसीत असलेल्या रेशीम विकास कार्यालयात नावनोंदणी करता येणार आहे.

७५ किलो ग्रॅम रेशीम कोष

पहिल्या वर्षी एक ते दोन वेळा व दुसऱ्या वर्षापासून चार ते पाचवेळा उत्पादन घेता येते. शंभर अंडीपुंजापासून सरासरी ७५ किलोग्रॅम रेशीम कोष उत्पादन होते. सद्यःस्थितीत त्याला ५० ते ६० हजार रुपये प्रति क्विटल भाव आहे. त्यामुळे पहिल्या वर्षात एक ते दीड व दुसऱ्या वर्षात अडीच ते तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. खर्च साधारण १५ ते २० हजार रुपये होतो.

२ लाख २० हजारांचे अनुदान

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत रेशीम शेतीचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत एक एकर शेतीसाठी ३ लाख ४२ हजार ९०० रुपये अनुदान दिले जाते. यासाठी लाभार्थी अल्पभूधारक, जॉब कार्डधारक असणे आवश्यक आहे. तुती लागवडीसाठी ३७ हजार ५०० रुपये, कीटक संगोपनगृहासाठी १ लाख २६ हजार रुपये, कीटक संगोपन साहित्यासाठी ५६ हजार २०० रुपये असे २ लाख ५० हजारापर्यंतचे अनुदान आहे.

कीटक संगोपनगृहाची आवश्यकता

रेशीम शेतीसाठी २० बाय ५० फूट आकाराचे कीटक संगोपनगृह (शेड) आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून अनुदान आहे. रेशीम कीटक दिवसातून दोनवेळा फांदी पद्धतीने पाला दिला जातो. त्यामुळे मजुरीच्या खर्चात बचत होते. लातूर तालुक्यातील नांदगाव येथे कौशल्य सिल्क हा रेशीम कोषापासून धागा निर्मितीचा प्रकल्प सुरु आहे.

१० ते १५ वर्षे मिळते उत्पन्न…

योजनांचा लाभ घेण्यासाठी किमान एक एकर क्षेत्रावर लागवड करणे अपेक्षित असून, दहा ते पंधरा वर्षे तुती बाग टिकते. त्यामुळे लागवडीचा खर्च नाही. उत्पादन खर्च व इतर पिकांच्या तुलनेत कमी आहे. तुतीची बाग चार ते सहा महिन्यांत तयार होते. दर अडीच महिन्याला दोनशे अंडीपुंजाद्वारे रेशीम उत्पादन घेतले जाते.

वाचा : टोमॅटोवर रस शोषून घेणाऱ्या किडीचे संकट! या उपायातून टाळता येऊ शकतो प्रादुर्भाव