अतिवृष्टीचा ऊस उत्पादकांना फटका; टनेजमध्ये ३० टक्के घट


Last Updated on November 24, 2022 by Piyush

जालना : अतिवृष्टीचा ज्याप्रमाणे सोयाबीन, मूग तसेच कपाशीला बसला आहे, त्याच धर्तीवर उसालाही या अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचे पुढे आले आहे. जून आणि जुलैत कमी पडलेला पाऊस तसेच नंतर झालेली अतिवृष्टीमुळे ऊस वाढीसाठी जो लख्ख सूर्यप्रकाश आवश्यक असतो, तो यंदा मिळाला नाही. ऊसवाढीच्या काळात बहुतांश काळ आकाशात ढगांची दाटी होती. त्यामुळे यंदाच्या उसाच्या टनेजमध्ये सरासरी ३० टक्के फटका बसला आहे.

गेल्यावर्षी अतिरिक्त उसामुळे शेतकरी आणि साखर उद्योग मोठ्या संकटात सापडला होता. जून अखेरपर्यंत काही कारखान्यांचे गाळप सुरू होते. तीच स्थिती यंदा येणार नसल्याचे दिसून येत आहे. आता उसाच्या फडात तो तोडण्यासाठी टोळ्यांची लगबग सुरू झाली आहे.

अंबड, घनसावंगी तसेच जाफराबाद, परतूर आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केलेली आहे. एकट्या कर्मयोगी अंकुशराव टोपे आणि सागर कारखाना हद्दीचा विचार केल्यास १५ लाख टनांचे गाळप शक्य असल्याचे सांगण्यात येते.

दुसरीकडे जालना जिल्ह्यात यंदाच्या अतिवृष्टीमुळे जवळपास २ लाख ६२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. याच्या
नुकसानीपोटी आता राज्य सरकारकडून ३९७ कोटी रुपये मंजूर झाले असले तरी ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत.

बेणे देण्यासाठी पुढाकार

साखर कारखान्यातून आता केवळ साखरेचे उत्पादन होते, असे नाही. आता वाहनांमध्ये इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करणे बंधनकारक केले आहे.

त्यामुळे अनेक साखर कारखाने हे त्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना को. १० हजार १ तसेच ८ हजार ०५, को. ८६३२, को. ३१०२ अशा वाणांना अधिक पसंती देण्याचे प्रयत्न करीत आहेत.

त्यासाठी कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी कारखान्याकडूनही बेणे देण्यासाठी पुढाकार घेतला जात असून त्यासाठी कारखान्याचे संचालक तथा माजी मंत्री आमदार राजेश टोप यांनी तशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

टोळ्यांसह १४ हार्वेस्टरची मदत

जालना जिल्ह्यात उसाची तोडणी जोमात सुरु झाली आहे. त्यात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचे महत्त्व हे कधीही अबाधित राहणार आहे; परंतु त्यांना मदत म्हणून हार्वेस्टरची मदतही ऊस तोडणीसाठी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. सागर आणि कर्मयोगी साखर कारखान्याकडे १४ हार्वेस्टर आहेत.

वाचा : थंडीच्या कडाक्याने द्राक्षपंढरी धास्तावली..! फुगवण थांबली