Gold Price Today: सराफा बाजारात सोन्याला झळाळी, ‘पाच वर्षांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ दरवाढ


Last Updated on December 5, 2022 by Piyush

Gold Price Today: डॉलरच्या उसळीने भारतीय सराफा बाजारात सोन्याला झळाळी मिळाली आहे, तर चांदीही यंदा पहिल्यांदाच चकाकली आहे. लातुरातील सराफा बाजारात प्रतितोळा सोन्याचा ५३ हजार ३०० रुपयांचा दर आहे, तर चांदीला प्रतिकिलो ६४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जेमतेम दरवाढ झाली. मात्र, डिसेंबर महिन्यात सोने चांगलेच झळाळले आहे. प्रतितोळा तब्बल दोन हजार ७०० रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ जीएसटीची रक्कम वगळून आहे. तीन टक्के जीएसटी लावल्यानंतर पुन्हा यामध्ये १००० ते १५०० रुपयांची वाढ होते. आता ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याने वधू-पित्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

५३,३०० वर पोहोचले सोने

वर्षभर सोन्याचे प्रतितोळ्याचे दर स्थिर होते. मात्र, डिसेंबर महिन्यात अचानक दराने उसळी घेतली आहे. रविवारी प्रतितोळा ५३ हजार ३०० रुपयांवर दर पोहोचला होता.

६४,००० वर चांदीला भाव

लातूर सराफा बाजारात रविवारी चांदीचा दर प्रतिकिलो ६४ हजारांवर पोहोचला होता. गेल्या सहा महिन्यात चांदीचा दर कमी-अधिक होता. मात्र, अचानक वाढ झाली.

‘पाच वर्षांत ‘रेकॉर्ड ब्रेक’ दरवाढ….

सराफा बाजारात शनिवार-रविवारी सोन्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांची वर्दळ दिसून आली नाही. अचानकपणे सोन्या-चांदीच्या दराने विक्रमी उंची गाठल्याने अनेक ग्राहकांची अडचण झाली आहे. ज्या ग्राहकांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात सोन्याची खरेदी केली. त्यांना या दरवाढीने फायदा झाला आहे. त्यांचे प्रतितोळा सोन्याच्या खरेदीत जवळपास

३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांची बचत झाली आहे. सध्याला युक्रेन-रशिया युद्धाचाही या दरवाढीवर परिणाम झाला आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळेही दरवाढ झाली आहे, असे लातुरातील सराफा व्यापायांनी सांगितले. सध्याची दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. दर कमी होतील, या आशेवर काहीजण होते. मात्र अचानक झालेल्या दरवाढीने झटका दिला आहे.

वाचा : ‘रेशन’ची माहिती आता मोबाईलवर..! घरबसल्या कळणार किती धान्य आले, किती मिळाले