नगर : ऐन रब्बी हंगामाच्या मोसमात रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी भरमसाट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे. आधीच अवकाळी पाऊस, सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे फवारणी करता-करता मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था खत दरवाढीने घरचे झाले थोडे अन् व्याह्याने धाडले घोडे’ अशी झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात खते उत्पादक कंपन्यांनी केलेल्या दरवाढीने खतांचे दर दुपटीने वाढले असून, या गंभीर प्रकाराकडे केंद्र व राज्य सरकारचे झालेले दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे.
जिल्हाभरात शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, मका, हरभऱ्यासह इतर कडधान्यांची दोन लाख ३१ हजार १५१ हेक्टरवर म्हणजेच ४१ टक्के पेरणी केली आहे. तसेच, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल आदी गळीत धान्यासह ऊस, कांदा या नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे.
७ लाख २६ हजार २९२ हेक्टरपैकी ५ लाख २ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. रब्बी हंगामातील एकूण क्षेत्रापैकी ६९ टक्के एवढे हे क्षेत्र असून, पिके वाढीला लागल्यामुळे आता दुसऱ्या डोसची नितांत गरज आहे. ऐन मोसमात डीएपी वगळता सर्व खतांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे.
५० किलोच्या प्रति गोणीची किंमत जवळपास दुप्पट झाली आहे. एकरी साध कारणतः दोन्ही डोस मिळून पीक काढणीपर्यंत दोन-तीन प्रकारचे खत ७ ते ८ गोण्या टाकाव्या लागतात. त्यामुळे वर्षभरापूर्वी ६ हजार रुपये येणारा खर्च थेट १० हजारांवर जाऊन ठेपला आहे.
गेल्या पंधरवाड्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. आठवडाभर मोठ्या प्रमाणात धुके होते. त्यामुळे कांद्यासह सर्वच पिकांना रोगराईने घेरले आहे. कांद्याने अक्षरशः माना टाकल्या असून, फवारणी करण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. लागवडीपासून सर्वसाधारणपणे २ ते ३ फवारणीवर काम चालून जात असे. परंतु, ढगाळ हवामानामुळे ५ ते ६ फवारण्या कराव्या लागत आहेत.
गहू, हरभयास २१ दिवसांनी तणनाशक फवारणी करावी लागते. कीटकनाकांच्या किमतीही सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. कोणत्याही पिकावर फवारणी करण्यासाठी एकावेळी दोन-तीन कीटकनाशकांचे मिश्रण करावे लागते. त्यामुळे एकरी एका फवारणीचा खर्च हजार-बाराशेच्यावर गेला आहे. फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकरी १० हजार रुपयांचा भूदंड सहन करावा लागत आहे.
खतांचे वाढलेले दर (आकडे रुपयांत)
खते | वर्षापूर्वीचे | सध्याचे | वाढ |
आरसीएफ- १५-१५ | ८४० | १४०० | ५६० |
ईफको-१०-२६-२६ | ११७५ | १४४० | २६५ |
महाधन-१०-२६-२६ | १०५० | ५५० | ५०० |
झुआरी-१९-१९-१९ | ११७५ | ५७५ | ४०० |
पोटॅश | ७४० | १०२० | २८० |
महाधन-२४-२४-२४ | ९६० | १७०० | ७४० |
कोरोमंडल २०-२०-० | ८६० | १३०० | ४४० |
माझी अडीच एकर शेतजमीन असून, एक एकर कांदा व इतर जमिनीत गहू, ज्वारी, हरभरा असे पीक आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून फवारण्याचा खर्च वाढला. त्याचबरोबर खतांच्या किंमतीही दरवर्षी वाढत आहेत. चालू वर्षात खरिपात खत दरवाढ झाली होती, आता पुन्हा भाव वाढले आहेत. तेव्हा जमीन पिकवायची कशी, असा प्रश्न आहे. कांद्यासाठी एकरी खर्च ७५ हजारावर गेला इतर पिकांचाही खर्च चांगलाच वाढला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे काहीच परवडत नाही, अशी सगळीच कोंडी झाली आहे. – सचिन पाटील, शेतकरी
माणदेशातून ‘पांढरं सोनं’ हद्दपार ! कापूस पिकाला ऊर्जितावस्थेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज