शेतकऱ्याचे सोयाबीन घरातच; भाववाढीसाठी चार महिने थांबा..!


Last Updated on December 8, 2022 by Piyush

वाशिम : केंद्र सरकारने खाद्यतेल व तेलबियांवरील स्टॉक लिमीट हटविल्याने सुरूवातीला सोयाबीनने प्रतिक्विंटलने साडेपाच हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आता पुन्हा बाजारभाव पाच हजारांच्या आसपास असून, भाववाढीसाठी आणखी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या जमिनीसह निकृष्ट असलेल्या जमिनीवर सोयाबीनचे उत्पन्न घटले. तर सुपीक जमिनीत सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले असले तरी बाजारात सोयाबीनच्या भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे जास्तीच्या भावाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे सध्या खरेदीचे मार्केट सध्या थंड आहे.

जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले. नदीकाठ व निकृष्ट दर्जाच्या जमिनीतील जवळपास ५० टक्केच्यावर सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्याचबरोबर सुपीक जमिनीत या पिकांचे चांगले उत्पन्न झाले.

ऑक्टोबर मध्ये सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल ५२०० ते ५३०० भाव होता तो सध्या ५८०० आहे. मधल्या १५ दिवसांमध्ये भाव ६००० पर्यंत गेला. गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा ५२०० ते ५३०० पर्यंत उतरला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता भाववाढीच्या प्रतीक्षेत घरातच थप्पी मारून ठेवला आहे. सध्या बाजारात आवक पूर्णतः ठप्प झाली आहे. गत वर्षी मार्च-एप्रिल मध्ये सोयाबीनला ८ हजार ते ९ हजार ५०० पर्यंत भाव झाला होता. त्यामुळे शेतकरी भविष्यात भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. वाचा : एक एकरात बिनपाण्याची शेती..! महिन्याला तब्बल दीड लाखांचं उत्पन्न

चार महिने वाट पाहावी लागणार

एका महिन्यांपूर्वी सोयाबीनच्या दरात प्रतिक्विटल ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली होती. सध्या सोयाबीनचे दर स्थिर आहेत. मात्र, भविष्यात यामध्ये सुधारणा होण्याचा अंदाज आहे. – आनंद चरखा अध्यक्ष, व्यापारी युवा मंडळ.

सध्या सोयाबीनला प्रतिक्विटल ४५०० ते ५२०० रुपयादरम्यान भाव आहेत. काही दिवस बाजारभाव स्थिर राहून तीन ते चार महिन्यांनी यामध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शेतमालाच्या बाजारभावात चढ उतार असल्याने अचूक अंदाजही सांगता येत नाही. – गजानन भूसारी, व्यापारी, वाशिम.

साडेचार हजारांत विकले तर खर्चही निघणार नाही

शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जात शेती करावी लागते. नवीन शेतमाल घरात आला की बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यंदाही येत आहे. चार ते साडेचार हजारात सोयाबीन विकले तर शेतीचा खर्चही निघणार नाही. • सुखदेव वानखडे, प्रगतशील शेतकरी.

शेतकऱ्यांचा वाली कोणी उरला नसल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल नसेल तेव्हा बाजारभावात वाढ झाली तर याचा शेतकऱ्यांना काय फायदा? हा साधा प्रश्न आहे. – गौतम भगत, प्रगतशील शेतकरी.

वाचा : खर्च 10 पटीनं.. उत्पन्न वाढेना, 80 टक्के अँपल बोराच्या बागा काढल्या