Last Updated on February 12, 2023 by Piyush
Cotton Farmer : मागील वर्षीच्या तुलनेत चालू हंगामात कापसाची आवक सरासरी ५५ टक्क्यांची घडल्याची माहिती सावनेर तालुक्यातील जिनिंग प्रेसिंग मालकांनी दिली. त्यामुळे ऐन हंगामात सर्व जिनिंग ओस पडल्याचे दिसून येत आहे. यावर्षी कापसाचे उत्पादन किमान ४५ टक्क्यांनी घटले असून, दर वाढण्याच्या प्रतीक्षेत कापूस विक्री थांबविल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात १ लाख ११ हजार ३०१ क्विंटल कापसाची कमी आवक झाली आहे. १ ऑक्टोबर २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ४ लाख ३७ हजार ६४३ क्विंटल कापसाची बाजारात आवक झाली होती. यावर्षी १ ऑक्टोबर २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२३ या काळात ३ लाख २६ हजार ३४२ क्विंटल कापूस बाजारात आल्याची माहिती जिनिंग प्रेसिंग मालकांनी दिली.
मागील वर्षी कापसाला सरासरी ११ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरणीक्षेत्रात वाढ केली. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कापसाचे दर सुरुवातीपासून दबावात आले आहेत. सध्या कापसाला ७,५०० ते ७,९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, किमान १० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, अशी अपेक्षाही अनेक कापूस उत्पादकांनी व्यक्त केली. त्यामुळे आपण कापूस विक्री थांबविल्याचे त्यांनी सांगितले.
कापूस बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा
खर्च वाढला आणि उत्पादन घटले
यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र वाढले असले तरी सततचा मुसळधार व अतिमुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे कापसाचे उत्पादन किमान ४५ टक्क्यांनी घटले आहे. त्यातच उत्पादन खर्च वाढला असून, कापसाला किमान १० हजार रुपये प्रति क्विटल दर मिळावा, अशी अपेक्षा हिरालाल आगरकर व मीननाथ बोबडे, रा. हत्तीसर्रा, महेंद्र बोंडे, रा. कोटोडी यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपण गरजेपुरता कापूस विकून गरज भागवित असल्याची माहिती त्यांनी दिली.
बाजारातील कापसाची आवक
मागील वर्षी रोज ४१ ते १२५ गाड्या कापसाची आवक होती तर यावर्षी ही आवक १० ते ५५ गाड्यांची असल्याचे जिनिंग मालकांनी सांगितले. मागील वर्षी बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग सावनेर येथे ४८.६२४ क्विटल, श्रीकृष्ण कॉटन माळेगाव येथे १,३६,८७४ क्विटल, कनक कॉटन खेरी (पंजाब) येथे २,०९,४६७ क्विटल, विजयालक्ष्मी कॉटन मंगसा येथे ४०,१३१ क्विटल, व्हाईट क्लिप सावनेर येथे २,५४४ क्विटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी बाबासाहेब केदार जिनिंग प्रेसिंग सावनेर येथे १६,८९७ क्विटल, श्रीकृष्ण कॉटन माळेगाव येथे १,२१,०३८ क्विटल, कनक कॉटन खैरी (पंजाब) येथे १,५९,६१२.३७ क्विटल, विजयालक्ष्मी कॉटन मंगसा येथे २८,७९३ क्विटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
कापूस बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लीक करा
वाचा : नोकरी करणाऱ्या महिलांना मुंबईत राहण्याचे नो टेन्शन! पालिका करणार सोय