भाव नसल्याने टॉमॅटो चक्क जनावरांपुढे, शेतकरी संकटात


Last Updated on January 3, 2023 by Vaibhav

कासार पिंपळगाव : पावसाळ्यात निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. त्यातून कसाबसा शेतकऱ्याने उसासा घेत रब्बीची पेरणी केली. रब्बीवरही कीडीचा प्रादुर्भाव झाला. काही शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. मात्र, दलाल त्यांना अक्षरशः लुबाडतो. गेल्या काही दिवसांत गगणाला भिडलेले टमाटरचे भाव आता एकदमच कोसळल्याने उत्पादनच नव्हे तर बाजारात विक्रीलाही आणण्याचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील टॉमॅटो चक्क जनावरांपुढे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी शिवारात परिसरात हा प्रकार शनिवार 31 डिसेंबर रोजी समोर आला. महिनाभरापूर्वी भाजीपाल्याचे दर पाहून ग्राहकांना घाम फुटायचा. ३० रुपये देऊन पावकिलो भाजीपाला मिळत नव्हता. पिशवीभर भाजीपाल्यासाठी जवळपास ५०० रुपये (पाचशे)मोजावे लागत होते. भाजीपाल्याचा हा दर जवळपास दोन ते तीन महिने(2-3 Month) सारखाच राहिला. मात्र, महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण घसरण पहायला मिळत आहे. याचाच फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

भाजीबाजारात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च, मजूर व भाजी बाजारात माल नेण्याचा खर्चही सध्या निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पाथर्डी तालुक्यातील सांगवी येथील येथील शेतकरी पुरुषोत्तम लोखंडे यांनी एक एकरात वांगी, टॉमॅटो, मिरची व कपाशीची लागवड केली.

मात्र, टॉमॅटोचे पीक काढणीला आल्यानंतर बाजारात भावच नाही. बाजारात अडीच ते तीन रुपये किलो, याप्रमाणे भाव मिळत असल्याने त्यांना टॉमॅटो तोडीसाठी मजुरांचा खर्च तसेच बाजारात विकण्यासाठी वाहतूक खर्चही निघत नाही. हतबल झालेले पुरुषोत्तम वैद्य यांनी टोमॅटो विकण्याऐवजी चक्क जनावरांनाच खाऊ घातले. शासनाने योग्य तो भाव ठरवून द्यावा, अशी मागणी पुरुषोत्तम लोखंडे यांनी केली आहे.

हेही वाचा: कापूस पिकाची उत्पादनक्षमात घटली; शेतकरी विवंचनेत !