अकोट: खरेदी बंदमुळे कापूस उत्पादक अडचणीत; चिंता वाढली!


Last Updated on December 10, 2022 by Piyush

अकोट येथील बाजार समितीतील कापूस लिलाव बंद पडल्याने कापूस उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत काही व्यापारी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांकडून बेभाव कापूस खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गतवर्षी कापसाला उच्चांक दर मिळाल्याने यावर्षी कवठा परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीवर भर दिला. त्यामुळे परिसरात कपाशीचा पेरा मोठा होता. त्यात अतिवृष्टी, संततधार पावसाचा पिकांना फटका बसला. त्यातून वाचलेल्या कपाशी पिकाचे काही प्रमाणात उत्पन्न हाती येत आहे. सद्य:स्थितीत कापूस पिकाचा हंगाम चालू आहे. मागील काही दिवसांपासून कापसाची चढ-उतार सुरू होती.

मात्र, शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याने कवठा बहादुरा, निंबा, निंबी, लोहारा, कारंजा, अंत्री येथील ७५ ते ८० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. काही शेतकरी गरजेपोटी कापूस विक्री करीत आहे. या भागातील शेतकऱ्यांना अकोट येथील कापूस बाजारपेठ जवळ आहे; परंतु अकोट बाजार समितीतील कापूस लिलाव बंद पडल्याने व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे कापुस उत्पादकांना खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

पैसा आणावा कुठून?

कापूस जिनिंगचा लिलाव बंद पडल्याने गावात येणाऱ्या व्यापाऱ्यांशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यामुळे घर खर्च, दवाखाना, लग्न समारंभ, इतर कार्यासाठी लागणारा पैसा कुठून आणावा, असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस बाजार बंदमुळे आजूबाजूच्या गावात व्यापारी बेभाव कापूस विकत घेत आहेत. असेच काही दिवस चालू राहिले तर शेतकऱ्यांना सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ येऊ शकते.

दरवाढीच्या अपेक्षेवर शेतकरी

आधीच शेतकऱ्यांना एकरी तीन-चार क्विटल कपाशीचे उत्पन्न झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत खते, फवारणी, निंदण आदी खर्च आला. त्यात सर्वच साहित्याची दरवाढ, मजुरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट वाढले. त्यामुळे कापसाचे दर वाढले, या अपेक्षेवर शेतकरी आहे.

एक अल्पभूधारक शेतकरी असून, दोन एकर कपाशीची लागवड केली आहे. तीन ते चार क्चिटल कापूस घरात आला. घर खर्चासाठी कापूस विकायला काढला असता कापूस बाजार बंदमुळे बेभाव विकावा लागत आहे. – गणेश तराळे, शेतकरी.

वाचा : मिरज पश्चिम भागातून ढबू मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर