श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी विशेष चौकशी समिती नेमणार


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

नागपूर: श्रद्धा वालकर हत्येपूर्वी घडलेल्या घटनांची चौकशी एक विशेष चौकशी समिती नेमून करण्यात येईल. त्याचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल, अशी घोषणा गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते. श्रद्धाला झालेली मारहाण, तिच्या वडिलांनी मागे घेतलेली तक्रार, त्यावेळची पोलिसांची भूमिका, याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव होता का? आदी अनेक मुद्द्यांवर ही चौकशी केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आमदार अतुल भातखळकर यांनी ही लक्षवेधी मांडली.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणात राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव होता असे आतापर्यंतच्या तपासात आढळून आलेले नाही. मात्र श्रद्धाने तक्रार दाखल करून ती मागे घेतली, त्यात तिच्यावर कोणाचा दबाव होता का, याबाबत तपास केला जात आहे. यासंदर्भात आ. आशिष शेलार, आ. सुनील प्रभू, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न विचारले होते.

याशिवाय उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीमध्ये मुंबईतील अंधेरीचा गोखले पूल धोकादायक ठरवून बंद केल्यानंतर त्याचे काम सुरू करायला वेळ का लागला, याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. पूल पडल्यावर दीड वर्षांनी कार्यादेश देण्यात आला. त्यानंतर दीड वर्षांनी काम सुरू झाले. या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी आ. अमित साटम यांनी केली. विविध लक्षवेधींना उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात योजना आखणे सुलभ होण्यासाठी सर्व खाती आणि विभागांची माहिती एका ठिकाणी संकलित करण्याचे काम ‘गतीशक्ती’ योजनेतून सुरू आहे. ते वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. अन्य एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना फडणवीस म्हणाले, यापुढील सर्व प्रकारच्या सेवा भरतीमध्ये अधिवास दाखला आवश्यक करण्यात आला आहे. त्यासाठी सेवा नियमात आवश्यक बदल केला जाईल.

ऊर्जा विभागाच्या लक्षवेधीवर ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असतानाच विधानसभा सभागृहातील ध्वनियंत्रणा बंद पडली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज 3 वेळा तहकूब करण्यात आले. यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आले.

हेही वाचा: नितीन गडकरी यांनी पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी पहिला ‘जामीन बाँड’ विमा केला सादर