देशभरात ८९०० जनऔषधी केंद्रे सुरू : सरकार


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

देशभरात आतापर्यंत ८९०० जनऔषधी केंद्रे सुरू झाली असून, दररोज जवळपास २० लाख लोक स्वस्त दरात औषध खरेदी करत असल्याची माहिती केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत दिली. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आलेल्या पूरक प्रश्नांचे उत्तर देताना रसायन व खतमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंबंधीची माहिती दिली.

जनऔषधी केंद्र योजनेचा मूळ उद्देश सर्व लोकांना खासकरून गरीब व वंचितांना कमी किमतीमध्ये गुणवत्तापूर्ण जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा आहे. सद्यःस्थितीत देशात ८९०० जन औषधी केंद्रे सुरू असून, दररोज जवळपास २० लाख लोक स्वस्त दरात औषधे खरेदी करत आहेत, असे मांडविया यांनी सांगितले. जनऔषधी केंद्राचे मालक १५ हजार रुपये प्रतिमहिन्याच्या सीमेअंतर्गत १५ टक्के मासिक खरेदीच्या दरानुसार प्रोत्साहन रकमेसाठी पात्र असतात.

याशिवाय उत्तर-पूर्व राज्य, हिमालयीन भाग, बेट आणि मागास भाग तथा महिला उद्योजक व दिव्यांग लोकांकडून उघडण्यात आलेल्या जनऔषधी केंद्रांना दोन लाख रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाते. सरकारने मार्च २०२४ पर्यंत देशात एकूण १० हजार जनऔषधी केंद्रे उघडण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे.

हेही वाचा: राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायदा करा! खा. उदयनराजे