Last updated on January 10th, 2022 at 12:43 pm
कर्जत तालुक्यात आणि त्यातही माथेरानमध्ये देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांविरुद्ध चळवळ उभी राहिली. त्यात आझाद दस्तासारखी देशप्रेमाने पेटून उठलेल्या तरुणांची फळी उभी करण्यात भाई कोतवाल यशस्वी ठरले. या आझाद दस्त्याचे यश इतके मजबूत होते की, त्यांच्या चळवळीमुळे ब्रिटिशांना इनाम लावायची वेळ आली होती. त्या इनामासाठी प्रसंगी फितुरी झाली आणि भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना ब्रिटिशांच्या गोळ्यांपुढे आपला देह ठेवावा लागला. या दोन्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला २ जानेवारी रोजी ७८ वर्षे पूर्ण होत आहेत.
माथेरानमध्ये भाऊसाहेब राऊत यांनी सुरुवातीपासून गावातील देशप्रेमी तरुणांच्य पाठीशी ताकद लावली होती. त्यामुले महात्मा गांधी यांनी १९४२ ला ब्रिटिशांविरुद्ध चले जावची हाक देण्यासाठी मुंबईत गवालिया टँकवर देशप्रेमी नागरिकांना बोलावले होते. त्यावेळी भाई कोतवाल आणि त्यांचे सहकारी तेथे उपस्थित होते. नंतर त्या सर्वांनी ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी योजना आखण्याचा निर्णय घेतला. मुंबई ही ब्रिटिशांनी आपली आर्थिक राजधानी केली होती. मुंबईला वीजपुरवठा काही मार्गिका कर्जत, अंबरनाथ तालुक्यातून जात होत्या. भिवपुरी येथील टाटा पॉवर स्टेशनमध्ये तयार झालेली वीज मुंबईला टॉवरच्या सहाय्याने जाते, त्या काळात टॉवरला ‘पायलन’ असा प्रचलित शब्द होता. ते पाडले तर मुंबईचा वीजपुरवठा खडित होईल. त्यामुळे ब्रिटिशांना थोडा त्रास देता येईल, अशी कल्पना भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्यातील प्रमुख मानिवलीच्या गोमाजी पाटील यांना सुचली.
वांगणीजवळील डोणे येथील टाटाची वीज वाहून नेणारे टॉवर (पायलन) पाडण्याचा निर्णय या पथकाने घेतला आणि पायलन २२ सप्टेंबर १९४२ रोजी पाडण्याचा निर्णय झाला. आझाद दस्त्यामध्ये नेरळजवळील मानिवली भागातील भगत मास्टर, मुंबई येथील रामलाल श्रीवास्तव, भास्कर तांबट, देशमुख अशी तरुण मंडळी आपल्या २० ते २५ सहकाऱ्यांसह रात्रभर काही तरी योजना राबवायचे आणि दिवसा भूमिगत होऊन योजना आखायचे. त्यात वीज वाहून नेणारे पायलन तोडण्याचे काम करत असताना टेलिफोनच्या तारा वाहून नेणाऱ्या खांबावरून त्या तारा नेण्यासारखी कामे रात्री करायचे. त्यासाठी दिवसा जागा निश्चित करण्याचे काम काही ग्रामस्थ मदत म्हणून करायचे. अनेकजण आझाद दस्त्यातील तरुणांना मदत म्हणून आर्थिक रसद आणि जेवण, भाजी-भाकरी पुरवायचे. पावसाचे दिवस असताना पायलन तुटून वीजपुरवठा खंडित होत असल्याने ब्रिटिश यंत्रणा हैराण झाली होती. त्यामुळे भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची माहिती देण्यासाठी रोख इनाम लावले गेले. तरीही काही मदत मिळत नसल्याने अखेर ब्रिटिशांनी जी मंडळी आझाद दस्त्यामध्ये आहेत, त्यांच्या घरच्या मंडळींना मारहाण करून त्यांच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागली. तसेच माहिती मिळाली नाही तर मग घरातील मोठ्या माणसांना पकडून नेण्याचे काम ब्रिटिश पोलीस करत असत.
मानिवलीचे गोमाजी पाटील हे दस्त्यातील प्रमुख समजले जात. यांचे पुत्र हिराजी हेदेखील वडिलांची कोणतीही माहिती देत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी हिराजीला पकडून नेरळ येथून कल्याणला नेण्यासाठी आणले. ब्रिटिश शिपायांच्या तावडीतून सुटका करून हिराजी भाई कोतवाल आझाद दस्त्यात सामील झाले. त्यावेळी त्यांचा मुक्काम मुरबाड तालुक्यातील सिद्धगड या जंगल भागात होता. त्या मुक्कामी दूध आणि भाजी-भाकरी घेऊन येणाऱ्या एका आदिवासी व्यक्तीकडे एक चिठ्ठी भाई कोतवाल यांनी बोरगाव येथील पाटील यांना देण्यास दिली. मात्र ती चिठ्ठी आदिवासींकडून घेऊन खंडू बोकड थेट ठाणे येथे पोहोचला.
थोड्याशा पैशाच्या लोभापायी ब्रिटिश अधिकारी पोलीस फौजफाटा घेऊन रात्रभर चालून सिद्धगड येथे पोहोचला. त्यावेळी झोपेतून उठत असलेल्या आझाद दस्त्यावर चौफेर गोळीबार सुरू केला. अचानक झालेल्या गोळीबारात आझाद दस्त्याचे अध्वर्यू भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झाले. अन्य सहकाऱ्यांना भाई कोतवाल यांनी गोळी लागताच तेथून पळून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अन्य लोक ब्रिटिशांना सापडले नाहीत. परंतु आपला २७ वर्षीय मुलगा गोळी लागून जखमी झाला असताना त्यांना अखेरचा पाण्याचा थेंब पाजणे गोमाजी पाटील यांना जमले नव्हते. ब्रिटिशांच्या गोळीमुळे भास्कर तांबट हेदेखील जखमी झाले होते. त्यांना त्यानंतर चार दिवसांनी मरण आले.