अकोला : बाजार समित्यांमध्ये सध्या तूर, सोयाबीन आणि हरभरा पिकांची आवक जास्त आहे. काही ठिकाणी तुरीला नऊ हजार रुपये, तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीनचे भाव सध्या स्थिर आहेत. यामध्ये तेजीची शक्यता कमी आहे.
खरीप हंगाम जवळ येत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरू असून, खत, बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत घरात साठवण केलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी काढला आहे. बाजार समितीमध्ये दिवसाला तूर, हरभरा आणि सोयाबीनचा हजारो क्विंटल माल विक्रीसाठी येत आहे. मात्र, शेतमालाच्या दरांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे.
मूर्तिजापुरात सोयाबीनला सर्वाधिक भाव
जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत मूर्तिजापूर येथील बाजार समितीमध्ये गत दोन दिवसांत सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विटल ४९०० रुपये भाव मिळाला. तसेच येथे सोयाबीनची आवकही १४०० क्विटल होती. त्यापाठोपाठ अकोला येथे तुरीला सर्वाधिक भाव मिळाला आहे. अकोला बाजार समितीत तुरीला १० हजार रुपये प्रति क्विटल भाव मिळाला आहे.
बाजार समित्यांत आवक वाढली
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या विविध शेतमालाची आवक वाढली आहे. अकोला येथील बाजार समितीमध्ये दिवसाला सोयाबीनची आवक दोन हजार १३७ क्विटलच्या आसपास राहत आहे.
अकोट बाजार समितीमध्ये कापसाची आवक सर्वाधिक आहे. १९ मे रोजी अकोट येथे कापसाची २५५० क्विटल आवक झाली आहे. तेल्हारा, पातूर, बाळापूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीन, तुरीची आवक होत आहे. त्यानंतर काही ठिकाणी हरभरा व मोहरीची आवक होत आहे.
वाचा : आता तुम्हालाही लावता येणार पावसाचा अंदाज! करा या सोप्या पद्धतीचा वापर अनं व्हा हवामान अभ्यासक