शिक्षकाची नोकरी सोडली अन् आयुष्यच सुधरले! शेतीतून आज लाखोंची कमाई


Last Updated on November 22, 2022 by Piyush

नागपूर : नापिकी किंवा कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यासाठी पारंपरिक शेती करून मिळेल तेवढे उत्पादन घेणे हेसुद्धा एक कारण सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. या समस्येवर मात करीत अंकित राऊत या शेतकऱ्याने सीताफळ लागवडीचा निर्णय घेत भरघोस उत्पादन घेतले आहे.

कळमेश्वरच्या झुनकी येथील अंकित राऊत यांनी ५ वर्षे खासगी शाळेतील शिक्षकाची नोकरी केल्यानंतर वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष देण्याचे ठरविले. यात ते दरवर्षी कापूस, सोयाबीन, तूर अशी पारंपरिक पिके घेत होते. मात्र यात उत्पादन कमी आणि तोटाच जास्त होत होता.

कधी कधी लागवड खर्चही उत्पादनातून मिळत नव्हता. त्यामुळे शेतात ओलिताचे साधन असल्याने त्यांनी फळबागेकडे वळण्याचा मनोमन विचार करून संत्रा, मोसंबीसोबतच २०१८ मध्ये त्यांनी २.२५ एकरांत ८५० सीताफळांची झाडे लावली.

यावर्षी त्यापैकी ६५० झाडांवर फळे लागली आहेत. फळबाग लागवडीचे. पहिल्यावर्षी आंतरपीक म्हणून तूर आणि मका, दुसऱ्यावर्षी सोयाबीन, तर तिसऱ्यावर्षी फक्त हरभरा पिकाचे उत्पन्न घेतले. झाडाची उंची बघता यावर्षी प्रत्येक झाडावर २५ ते ३० फळे लागली आहेत. मागीलवर्षी फळाची चव कळावी म्हणून परिचित लोकांना निःशुल्क तसेच कमी दरात सीताफळ दिले.

आता मात्र फोनद्वारे ऑर्डर येत असल्याने जागेवरूनच माल विकला जातो; तर काही उरलेला माल कॉटन मार्केट, नागपूर येथील बाजारपेठेत विकला जातो. फळाचा दर्जा आणि चव उत्तम असल्यामुळे माल विकणे कठीण जात नाही. यावर्षी खर्च वगळता २ लाख २५ हजाराचा निव्वळ नफा झाला.

झाड जसजसे वाढत जाईल तसतसे प्रत्येकवर्षी दीडपट उत्पादन वाढणार आहे. तसेच शासकीय योजनेत सीताफळ लागवडीचे अंतर जास्त असल्याने ही लागवड स्वखर्चाने केली होती, असे अंकित राऊत यांनी सांगितले.

ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करून दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला शेणखत टाकले जाते. पहिली २ वर्षे जीवामृत व डी कंपोजर वापरले. त्यानंतर बायोगॅस स्लरी टाकणे सुरु आहे. हे उत्पादनाचे पहिले वर्ष आहे. तसेच ओलितासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जातो. – अंकित राऊत, शेतकरी, झुनकी.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृतमहोत्सवी फळझाड/ वृक्ष लागवड व फूलपीक लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. – राकेश वसू, तालुका कृषी अधिकारी, कळमेश्वर.

वाचा : अकोट बाजार समिती: पांढऱ्या सोन्याचा बाजार स्थिरावला; आवक घटली