आता घर खरेदीच्या वेळीच सांगा, अ‍ॅमेनिटीज काय अन् कधी देणार ?

पुणे : गृहप्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये विकसक आकर्षक अ‍ॅमेनिटीज देण्याची आश्वासने देतात. नवे घर घेताना सर्व सुविधा-सुखसोयी पाहूनच नागरिक व्यवहार करतात. परंतु, प्रत्यक्षात करारात मात्र याचा तपशील कुठेही नसतो. यामुळे आश्वासित अ‍ॅमेनिटीजपैकी मोजक्याच सोयीसुविधा देऊन ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक होऊ नये यासाठी महारेराने पुढाकार घेतला आहे. यामुळे आता ‘अ‍ॅमेनिटीज कधीपर्यंत देणार आहात? हे दस्तनोंदणीच्या वेळीच विकसकांना नमूद करावे लागणार आहे.

गृहप्रकल्पातील सोयी-सुविधा तसेच अ‍ॅमेनिटी देताना त्या उपलब्ध करून देण्याचा कालावधी दस्तनोंदणीवेळीच विकसकांनी नमूद करावा, असे स्पष्ट निर्देश महारेराने विकसकांना दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे विकसकासोबतचे वाद टळणार आहेत. ही तरतूद अपरिवर्तनीय बाब म्हणूनही प्रस्तावित केलेली आहे. यात कोणताही परस्पर बदल करता येणार नसल्याचे महारेराने स्पष्ट केले आहे.

पार्किंगबाबतही त्रुटी दूर करून त्यात सुसूत्रता आणणारा अपरिवर्तनीय तरतुदीचा आदेश महारेराने नुकताच जारी केल्यानंतर आता नवीन गृहनिर्माण प्रकल्पांतील सुविधांबाबत (फॅसिलिटी) तसेच सुखसोयीमधील (अ‍ॅमेनिटीज) अनिश्चितता संपविण्यासाठी पावले उचलली आहेत. आदर्श विक्री करारात अनुसूची दोनमध्ये (इंडेक्स 2) आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा केवळ उल्लेख होता.

प्रस्तावित आदेशात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार आहेत, याचा तपशील देणे बंधनकारक आहे. प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात (इमारतीचा कॉमन एरिया) आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात (ले आऊट) द्यायच्या तरणतलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाट्यगृह, सोसायटीचे कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट अशा आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवासी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार, त्याचा आकार काय राहील, याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार असल्याचे नवीन आदेशात नमूद केले आहे.

विक्री करार करताना (अ‍ॅग्रिमेंट फॉर सेल) या प्रस्तावित आदेशासोबत दिलेल्या जोडपत्राच्या मसुद्यानुसार विक्री कराराचा भाग म्हणून देणे बंधनकारक आहे. सर्व संबंधितांनी secy@ maharera. mahaonline.gov.in या ईमेलवर याबाबत सूचना, हरकती 27 मेपर्यंत पाठवाव्या, असे आवाहन महारेराने केले आहे.

घर खरेदीदारांची फसवणूक होऊ नये, यात प्रवर्तकाची जबाबदारी वाढून पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी महारेराने विक्री करारात ही बाब जोडपत्रात सर्व तपशिलासह देणे बंधनकारक केलेली आहे.

आश्वासित अॅमिनिटीज मिळतच नाहीत…

कुठल्याही नव्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या विक्री करारात प्रकल्पाचे बांधकाम, सदनिकांचा विनिर्देशांसह तपशील, आतील, बाहेरील कामे, प्रकल्प उभारणीच्या, पूर्ततेच्या टप्पेनिहाय विविध तारखा, त्यानुसार पैसे भरण्याचे वेळापत्रक, सदनिकांची किंमत, सदनिका हस्तांतरणाची तारीख, त्यास विलंब झाल्यास प्रवर्तकाने द्यायचा दंड आणि ठरल्यानुसार पैसे भरण्यास विलंब झाल्यास घर खरेदीदाराने द्यायचे व्याज, असा तपशील असतो. परंतु, विक्री करारात प्रकल्पाच्या सुविधा व अॅमिनिटी याचा तपशील नसतो. अपवादाने असलाच तर या सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार याचा तपशील नसतो. त्यामुळे अनेकदा सदनिका नोंदणी करताना आश्वासित सुखसोयी राहायला गेल्यानंतर आश्वासनानुसार उपलब्ध असतातच असे नाही.

सहावी अपरिवर्तनीय तरतूद

घर खरेदीदारांच्या दृष्टीने याचेही महत्त्व लक्षात घेता ही तरतूद अपरिवर्तनीय राहणार आहे. यापूर्वी प्रमाणित विक्री करारातील नैसर्गिक आपत्ती, दोषदायित्व कालावधी, चटई क्षेत्र, हस्तांतरण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या पार्किंगनंतर ही सहावी तरतूद अपरिवर्तनीय राहणार असल्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे.

27 मेपर्यंत नोंदवा हरकती

गृहनिर्माण प्रकल्पांतील आश्वासित सुविधा, सुखसोयींची अनिश्चितता संपवण्यासाठी महारेराचा निर्णय

अॅमेनिटीज कधी उपलब्ध होणार याची तारीख देणे बंधनकारक, ही तरतूदही • पार्किंगप्रमाणेच अपरिवर्तनीय राहणार असल्याने याचा ग्राहकांना फायदा होईल.

या आदेशाचा मसुदा सूचना, हरक- तींसाठी महारेराच्या संकेतस्थळावर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी टाकण्यात आला आहे. यावर २७ मेपर्यंत हरकती नोंदवा असे महारेराचे आवाहन केले आहे

वाचा : प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच घर खरेदी-विक्री, महारेराचा विकासकांना इशारा

Leave a Comment