म्हाडाच्या बोळींजमधील घरांची विक्री पुन्हा थंड, निविदेला महिनाभराची मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने विरारमधील बोळींज येथे बांधलेल्या, परंतु विक्रीच होत नसलेल्या पाच हजारपैकी एक गठ्ठा 100 घरे घेणाऱ्याला किमतीत 15 टक्के सवलत देण्याचा पर्याय उपलब्ध केला होता. यासाठी मंडळाने मार्चमध्ये निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, प्रतिसादच न मिळाल्याने या निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर ओढवली आहे. या निविदेला आता २ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कोकण मंडळाने बोळींजमध्ये सर्वात मोठा 10 हजार घरांचा प्रकल्प उभारला आहे. मात्र हाच सर्वात मोठा प्रकल्प मंडळ, म्हाडा प्राधिकरणासाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनला आहे. या प्रकल्पातील 50 टक्के अर्थात पाच हजार घरे विक्रीविना कित्येक वर्षे धूळ खात पडून आहेत. अनेक सोडतींमध्ये या घरांचा समावेश करण्यात आला होता. या घरांचा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतही ही घरे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र त्यांची विक्रीच होवू शकलेली नाही. परिणामी, मंडळाला हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. विविध समस्यांमुळे या घरांची विक्री होवू शकलेली नाही. या समस्या सोडविण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात आला. पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी या घरांकडे पाठ फिरविली होती. पण आता सूर्या प्रकल्पाचे पाणी आल्यानंतरही या घरांची विक्री होवू शकलेली नाही.

एकूणच बोळींजमधील घरांच्या विक्रीचा प्रश्न मार्गी लावणे म्हाडा प्राधिकरणासाठीही गरजेचे बनले होते. त्यामुळे प्राधिकरणाने रिक्त घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण तयार करून पाच पर्याय दिले होते. या पाच पर्यायांपैकी एकगठ्ठा 100 घरे विकण्याचा पर्याय स्वीकारत मंडळाने मार्चमध्ये यासाठी निविदा प्रसिद्ध केली. एकगठ्ठा 100 घरे विकताना इच्छुक संस्थेला, व्यक्तिला किंमतीत 15 टक्के सवलतही देण्यात येणार आहे. ज्या खासगी संस्थांना, सरकारी यंत्रणांना निवासस्थानासाठी वा इतर वापरासाठी अधिक घरे हवी असतील त्यांच्याकडून या पर्यायाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा मंडळाला होती. यासाठी 2 मे रोजी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नाही. अखेर निविदेला महिन्याभराची मुदतवाढ दिली आहे. नव्या मुदतवाढीनुसार आता 1 जूनपर्यंत निविदा सादर करण्याची संधी इच्छुकांना मिळेल.

वाचा : मुंबईकरांसाठी खुशखबर! एक लाख घरांची होणार सोडत; फक्त एवढ्या किमतीत मिळणार 1 BHK फ्लॅट

Leave a Comment