Soybean Farmer: कुरतडलेल्या सोयाबीनवर शासन करणार का फवारणी ?


Last Updated on December 10, 2022 by Piyush

नागपूर : सन २०२२-२३ च्या खरीप हंगामात राज्यात सोयाबीनचे (soybean) पेरणी क्षेत्र वाढले असले तरी सततचे ढगाळ वातावरण, मुसळधार व अति मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकावर झालेल्या रोग व किडींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेसोबतच उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढला असताना दर मात्र जेमतेम मिळत असल्याने राज्य सरकार यावर कायमस्वरूपी तोडगा काढणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोयाबीनपासून केवळ १७ ते १८ टक्के तेल मिळत असले तरी आपल्या देशात या पिकाकडे तेलबिया म्हणून बघितले जाते. देशात सोयाबीन उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. मागील पाच वर्षांपासून सोयाबीनचे पीक विविध किडी आणि रोगांना बळी पडत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागते.

चालू खरीप हंगामात जुलै ते ऑक्टोबर या काळात राज्यात सर्वदूर सातत्याने मुसळधार व अति मुसळधार पाऊस कोसळला. पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली. प्रतिकूल हवामानामुळे पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव झाला.

पुरामुळे पिके खरडून गेली. रोग व किडींच्या तावडीतून पीक वाचवायचे झाल्यास महागडी कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढतो. तुलनेत दर मात्र सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

उत्पादकतेसोबत उत्पादनात घट

मागील हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात राज्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ३ लाख ४ हजार ७२० हेक्टरने वाढले आहे. सात-आठ वर्षापूर्वी सरासरी एकरी किमान ९ ते १३ क्विटल सोयाबीनचे उत्पादन व्हायचे. तीन-चार वर्षांपासून सरासरी एकरी ३ ते ५ क्विटल सोयाबीनचे उत्पादन होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

या किडींचे संकट कायम

मागील तीन वर्षांपासून सोयाबीनवर येल्लो मोझॅक या बुरशीजन्य रोगासह, खोडमाशी, चक्रीभुंगा. पाने खाणारी हिरवी उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी, केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी. पांढरी माशी यासह इतर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने सोयाबीनची उत्पादकता व उत्पादन घटत असून, उत्पादन खर्च वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वाचा : सीताफळाचे दर घसरले; उत्पादक संकटात, केलेला खर्चही निघेना