Last Updated on January 4, 2023 by Vaibhav
मुंबई : राज्यातील २ कोटी ८८ लाख वीज ग्राहकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समिती बुधवारपासून ७२ तासांचा संप पुकारला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सोमवारी रात्री उशिरा प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर पार पडलेल्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने वीज कर्मचाऱ्यांचा संप अटळ आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समितीचे कामगार नेते कृष्णा भोयर यांनी दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने सुरू केलेल्या संपासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्यातील १४ कोटी जनतेला समितीने केले आहे.
सोमवार, २ जानेवारी २०२३ रोजी वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने पुकारलेल्या आंदोलन व संपाबाबत महाराष्ट्र शासनाचे प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, तसेच इतर अधिकारी यांच्याबरोबर संघर्ष समितीतील ३१ संघटनांची बैठक प्रकाशगड, वांद्रे (पूर्व) येथे संपन्न झाली.
बैठकीच्या सुरुवातीला संघर्ष समितीमध्ये सहभागी संघटनांचे पदाधिकारी यांनी शासन व प्रशासनाने आंदोलन व संपाची सूचना दीड महिन्यापूर्वी देऊनसुद्धा कुठलीही दखल घेतली नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून अशा पद्धतीचे धोरण सरकारचे व प्रशासनाचे बरोबर नाही, अशी नाराजी व्यक्ती केली.
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या भागामध्ये अदानीसारख्या खासगी भांडवलदाराचा समांतर वीज वितरणाचा परवाना आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याच पद्धतीने इतर दोन कंपन्यांमध्येसुद्धा कोणत्याही पद्धतीचे खासगीकरण संघर्ष समिती सहन करणार नाही, असे समितीने यावेळेस स्पष्ट केले.
महावितरणकडून विशेष दक्षता
३ दिवसांच्या संपकाळात महावितरणची विशेष टीम वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सज्ज राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात खासगी वीज वितरणदार वाढू नयेत, यासाठी एकीकडे कर्मचारी संपात सहभागी असले तरीही वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. १८००- २१२-३४३५/१८००-२३३-३४३५/१९१२/ १९१२० यावर संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक
संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४ जानेवारी रोजी दुपारी १ वा. सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येणार आहे.