Last updated on January 10th, 2022 at 02:49 pm
अमरावती : कोविड- १९ आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ देण्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. त्यानुसार गरजू कामगार पाल्यांनी मंडळाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाऱ्या नोंदीत आस्थापनांतील कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध आर्थिक लाभाच्या योजनांसह कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात. यात प्रामुख्याने इयत्ता दहावी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कामगार पाल्यांसाठी २००० ते ५००० रुपयांची शिष्यवृत्ती परदेशात उच्च शिक्षणासाठी ५० हजारांची शिष्यवृत्ती, राज्य, राष्ट्रीय, “आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक खेळात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या कामगार व कामगार पाल्यांना २ हजार ते १५ हजार रुपये शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदी किमतीच्या ५० टक्के रक्कम १ हजार ५०० ते २ हजार ५०० पर्यंत अर्थसहाय्य,एमएससीआयटी अभ्यासक्रम शुल्काच्या ५० टक्के रक्कम अर्थसहाय्य, गंभीर आजार उपचारासाठी ५ हजार ते २५ हजार अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वःलिखीत पुस्तक प्रकाशनासाठी १० हजारांचे अर्थसहाय्य, शिवणमशीन खरेदीसाठी ९० टक्के अर्थसहाय्य, दहावी, बारावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गण प्राप्त करणाऱ्या गणवंत कामगार पाल्यांचा गौरव आदी योजनांचा समावेश आहे.
तसेच कामगार कुटुंबीयांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंडळातर्फे युनिसेफच्या सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास पुढील ३ वर्षे त्यांच्या कुटुंबीयांना मंडळाच्या योजना, उपक्रम व कार्यक्रमांचा लाभ घेता येतो. कामगार मंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता कोविड-१९ आजारामुळे निधन पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनादेखील मंडळाच्या आर्थिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मंडळाच्या नजीनच्या केंद्रास किंवा संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग आढळल्यास चमकणारा मास्क