पांढऱ्या सोन्याला दरवाढीची प्रतीक्षा, कपाशीची आवक मंदावली


Last Updated on December 14, 2022 by Piyush

वाशिम : गत काही दिवसांपासून कपाशीच्या दरात चढ- उतार कायम राहत आहे. दरवाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असल्याने बाजारातील आवक मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे.

वाशिम, अनसिंग बाजारपेठेसह इतर ठिकाणच्या बाजारपेठेत गत काही दिवसांपूर्वी कापसाची मोठी आवक होत होती. मात्र, सद्य:स्थितीत आवक कमी होत आहे. गत हंगामात ११ हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. मात्र, खरीप हंगामात वेळोवेळच्या अतिवृष्टीमुळे कपाशीचे नुकसान झाले. कीड व विविध रोगांमुळे कापसाचा उतारा घटला.

आजमितीस आठ हजार ३०० ते आठ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे कापसाला भाव मिळत आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापसाची घरी साठवणूक केली आहे. त्यामुळे कापसाची आवक मंदावल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात कपाशीचे सरासरी क्षेत्र १८ हजार ०१३ हेक्टर होते. प्रत्यक्षात २२ हजार ९८ हेक्टरवर पेरणी झाली. जुलै ते ऑक्टोबर महिन्यामध्ये सतत पाऊस झाला. त्यामुळे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच बॉडअळी व ल्याल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे सरासरी उत्पादनात घट झाली आहे. दोन ते तीन वेचणीत कापसाच्या पन्हाट्या होताच शेतकऱ्यांनी कापसाचे रान मोकळे करीत हरभरा व गहू पेरणी केली.

कापसाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, सद्यःस्थितीत भाव कमी असल्याने कापसाची साठवणूक करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. त्यामुळे बाजारात कापसाची आवक मंदावली आहे.

भाववाढीचे संकेत कमी

सद्या भाव वाढण्याचे संकेत सद्यातरी कमी आहे. बाहेर देशात कापसाची मागणी कमी आहे. ४० ते ५० टक्केच सुत बनविले जात आहे. इम्पोर्ट ड्युटी अशा विविध कारणामुळे सद्यातरी कपाशाचे भाव वाढणार नसल्याचे अनसिंग येथील व्यापायांनी सांगितले.

सध्या कापसाला ८३०० ते ८५०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. सध्या दरवाढीची शक्यता नाही. कापासाचा भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापसाची विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्याला पसंती दिली आहे. परिणामी सद्यस्थितीत आवक मंदावली आहे. सद्यातरी भाववाढीचे संकेत दिसून येत नाही. -संजय गट्टाणी, व्यापारी, अनसिंग.

कापसाला गतवर्षी १९ हजार क्विटल भाव होता. त्यामुळे यंदा देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाव अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भाववाढीचे अपेक्षा आहे. भाव वाढेल या अपेक्षेने ४० क्विटल कापूस विक्री केला नाही. – रामराव घोलप, शेतकरी अनसिंग.

वाचा : खरा दूध उत्पादक ‘दगामास्तर’ झाला दूध संघात संचालक