तूरही शेतकऱ्यांना तारणार की नाही? दर घसरले, साडेसहा हजारांपेक्षा कमी


Last Updated on November 29, 2022 by Piyush

वाशिम : सप्टेंबर महिन्यात आठ हजार रुपये प्रति क्विंटल रुपयांच्या घरात पोहोचलेली तूर आता थेट साडेसहा हजारांच्या खाली आली आहे. नव्या तुरीचा हंगाम आता महिनाभरावर आला आहे. त्यामुळे सोयाबीननंतर आता तूरही शेतकऱ्यांना तारणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बाजार समित्यांत मागील दोन महिन्यांपासून शेतमालाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कच्च्या तेलासह सोयापेंडीच्या आयातीचा निर्णय, तसेच तूर डाळीच्या आयातीचा निर्णय घेतल्यानंतर देशांतर्गत तूर आणि सोयाबीनच्या दरात मोठी घसरण सुरू झाली.

सप्टेंबर महिन्यात सात हजारांच्या वर पोहोचलेले या दोनही शेतमालांचे दर आता हजार दीड हजारांनी घसरले आहेत. नव्या सोयाबीनची आवक वाढताच बाजारात या शेतमालास जेमतेम साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर मिळू लागले आहेत, तर तुरीला साडेसहा हजार रुपयांपर्यंतचे दर मिळत आहेत.

शेतकऱ्यांकडे तूर नसताना शासनाची खरेदी

देशात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात मागणीच्या तुलनेत अचानक तुरीचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे तुरीच्या दरात मोठी वाढ झाली. तुरीची डाळही महाग झाली आणि सणांच्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवित सरकारने तूर खरेदीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांकडे तूर नसताना हा निर्णय झाल्याने त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला.

महिनाभरात हजार रुपयांची घसरण

सोयाबीनंतर तुरीच्या पिकातून शेतकऱ्यांना आशा होती. तथापि, सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत साडे सात हजारांच्यावर विकली जाणारी तूर आता थेट सहा ते साडे सहा हजार रुपये प्रती क्विटलवर पोहोचली आहे. त्यामुळे सोयाबीननंतर आता शेतकऱ्यांच्या हाती तुरीतूनही काहीच पडणार नसल्याचे दिसू लागले आहे.

गतवर्षीही शेतकऱ्यांना फटका

मागील हंगामातही दूर हाती आल्यानंतर बाजारभाव कोसळले होते. शेतकऱ्यांना ५५०० ते ६००० हजार रुपयाने तूर विकावी लागली. तर हमीभाव ६३०० रुपये होता. या काळात सरकारने बफर स्टॉकसाठी खरेदी करणे गरजेचे होते, पण सरकारने केवळ ३५ हजार टन खरेदी केली. तर देशात उत्पादन झाले ४३ लाख टन. म्हणजेच सरकारने एक टक्क्यापेक्षाही कमी खरेदी केली.

हे तर नित्याचेच षडयंत्र

शेतकऱ्यांचा माल हाती आला की, भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांनी माल विकला की, दरात वाढ होते. हे नित्याचेच षडयंत्र आहे. आम्ही मोठ्या आशेने तुरीची पेरणी वाढवलीण आता मात्र दर घसरल्याने हातावर तुरीच पडणार असल्याचे दिसते. – सुनील उपाध्ये, शेतकरी, काजळेश्वर.

गतवर्षीही तुरीला चांगले दर मिळाले नाही. मान्सून लावल्याने आम्ही उडिद, मुगाची पेरणी टाळून तुरीचे क्षेत्र वाढवले. तुरीला चांगले दर मिळण्याची अपेक्षा होती. तसेही शेतकऱ्यांचा माल हाती येण्याची वेळ आली की दर पाडण्याची प्रथा पूर्वीचीच आहे. – श्रीकांत वलोकार, शेतकरी कोठारी.

पंचवीस ते तीस रुपयांना मेथीची जुडी, तर शेवग्याने मारली दोनशेवर उडी