जळगाव : यंदा कापूस उत्पादन कमी असल्याने कपाशीला चांगला भाव आहे. कपाशीचे दर प्रथमच दहा हजार रुपयांवर गेल्याने कापूस उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. पण कापसाच्या वाढत्या भावाने दक्षिणेच्या कॉटन लॉबीकडून भाव नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. भावातील चढ उताराचा फटका बसू नये म्हणून जिनिंग उद्योजकांसोबत व्यापारी वर्ग चिंतेत आहेत.
कापूस दरातील तेजीमुळे कापूस प्रक्रिया, टेक्स्टाइल उद्योगाची चिंता वाढली आहे. कापसाच्या तीव्र टंचाईमुळे उद्योगांना कापूस गाठी मिळण्यात अडचणी येत आहेत. कापसाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी कापसावरील दहा टक्के आयात शुल्क कमी करून कापूस आयात सुरू करावी, कापसाला वायदे बाजारातून वगळण्यात यावे, टेक्स्टाइल उद्योगाला कापूस गाठींचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पुढाकार घ्यावा या मागण्या घेऊन कॉटन लॉबी मैदानात उतरली आहे.
कापूस दरावर नियंत्रणासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयासोबत कॉटन उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींची बैठक १ फेब्रुवारीस होणार असल्याची माहिती खानदेश जिनिंग प्रेसिंग मील ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली. या बैठकीत कापूस उद्योगातील अडचणी, निर्यातबंदी, आयात शुल्क, वाहतूक भाडे आदी बाबींवर चर्चा होणार आहे.
सोयाबीनचे भाव स्थिरावले; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम