टोमॅटो दरात पुन्हा घसरण, एका दिवसात 80 रूपयांवरून दर घसरून नवा दर आहे…


Last Updated on November 18, 2022 by Piyush

नाशिक : टोमॅटोचे दर निचांक पातळीवर घसरल्याने उत्पादकांची चिंता वाढली असून, खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे उत्पादक हवालदिल झाले आहेत. दिंडोरी तालुक्यात यावेळी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड करण्यात आली. समाधानकारक दर मिळतील या अपेक्षेने लागवड क्षेत्रात झालेली वाढ यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न याचे नियोजन आखणारे टोमॅटो उत्पादक दर घसरल्याने मेटाकुटीस आले आहेत.

वाहतुकीचा खर्च सोसवत नाही

सध्यस्थितीत ६० रुपये दर विस किलो टोमॅटोचा आहे. २० रुपये कॅरेट खुडणीसाठी, २० रुपये कॅरेट टोमॅटो विक्री केंद्रात नेण्यासाठी वाहतूक खर्च तर शेतकऱ्यांच्या हातात मात्र २० रुपये येतात. असेच दर राहीले तर टोमॅटो उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज उत्पादक सुनील थोरात यांनी वर्तविला आहे.

टोमॅटो खरेदीदार प्रामुख्याने परप्रांतीय व्यापारी आहेत. एका कॅरेटचे वाहतूक भाडे परप्रांतात वाहतूक करुन टोमॅटो विक्रीच्या दराचे गणित लावले तर ते जुळत नाही. कारण परप्रांतात परवडणाऱ्या दरात टोमॅटो उपलब्ध होत असल्याने वाहतूक भाड्याचा अतिरिक्त खर्च सोसण्याची भूमिका परप्रांतीय व्यापाऱ्यांची नाही व त्यामुळे येथील टोमॅटो खरेदी करण्याच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

बाजार समितीत आवक जास्त अन् मागणी कमी

दरम्यान, दिडोरी तालुक्यात सध्यस्थितीत ८० टक्के टोमॅटो उत्पादाकांचा टोमॅटो बाजार समित्यांच्या खरेदी विक्री केंद्रावर येत आहे. आवक जास्त व मागणी कमी यामुळे खरेदी विक्री व्यवहार प्रणालीत समन्वय राहीला नाही. त्यात दर घसरल्याने नुकसानीचे चित्र आर्थिक फटक्यांस अनुसरुन उत्पादकांपुढे उभे आहे.

टोमॅटो हे साठवणूक करण्यासाठीचे पिक नाही. भविष्यात दर सुधारतील अशी अपेक्षा नाही. यामुळे हतबल झालेले उत्पादाकांपुढे आता काय? असे प्रश्न उभे ठाकले आहेत. नुकसानीच्या या गर्तेतून मार्ग काढणे अवघड असल्याच्या संकेताने टोमॅटो उत्पादकांची मानसिकता दोलायमान झाली असल्याची माहिती प्रकाश कड, राजेंद्र थोरात, रविंद्र थोरात, सतिष जाधव यांनी दिली.

एक एकरासाठी एक लाख खर्च

दिल्ली, पंजाब, चंदिगड, राजस्थान व इतर राज्यांत नाशिक जिल्ह्यातील | टोमॅटोचा नावलौकिक आहे, मात्र अतिवृष्टीमुळे झालेला रोगाचा प्रादुर्भाव व परराज्यात सुरु झालेले टोमॅटो उत्पादन यामुळे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोचा दर निच्चांकी पातळीवर पोहचला आहे.

टोमॅटो लागवडीसाठी एक एकरासाठी सुमारे ८० हजार रुपये खर्च येतो व मल्चिंग पेपरचा वापर केल्यास एक लाख रुपये एकरी खर्च येतो. आधुनिक पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी अग्रक्राम देणारे उत्पादक सध्याच्या टोमॅटो दरामुळे निराश व अस्वस्थ झाले आहेत.

लागवड, उत्पादन व अनुषांगिक खर्च

वावर मशागत, नांगरणी, रोटरी, बेड मारणे एकरी खर्च ८ हजार रुपये. बेसल डोस एकरी खर्च १२ हजार रुपये, मल्चिंग पेपरचा वापर केल्यास ३० हजार रुपये एकरी खर्च, एकरी रोपलागवड १० हजार रुपये, तार काठी बांबू ५० हजार रुपये, टोमॅटो बांधणी १५ हजार रुपये, ड्रीप १० हजार रुपये, विद्राव्य खते ४० हजार रुपये, रोगप्रतिबंधक फवारणी दीड लाख रुपये, एक एकर क्षेत्रात १ हजार ते १२०० कॅरेट टोमॅटो दोन ते तीन महीन्यात उत्पादीत होतो.

वारेमाप खर्च करुनही पदरी निराशा

पाकीस्तान व बांगला देशात निर्यातबंदी असल्याने टोमॅटो निर्यात होण्यास अडचणी येतात तसेच परप्रांतात तेथील स्थानिक ठिकाणी उत्पादन व आवक सुरु झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हा दर्जेदार व चविष्ट मानन्यात येतो. मात्र अतिवृष्टीमुळे दरात प्रतिकूल परिणाम झाला. टोमॅटोच्या प्रतवारी व दर्जाला याचा फटका बसल्याने टोमॅटो उत्पादक आर्थिक दृष्टीकोनातून उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, उत्पादनासाठी वारेमाप खर्च करुनही पदरी निराशा पडल्याने शेतकरी वर्गाचे डोळे पाणावले आहेत, अशी माहिती टोमॅटो उत्पादक तुषार देशमुख यांनी दिली.
वाचा : कांद्याच्या आगारात रोपांची टंचाई