‘पैसे घेऊनही मतदान करत नाही’ म्हणत चक्क देवाच्या डोक्यावर हात ठेवायला लावला; पराभूत उमेदवारांचा व्हिडीओ व्हायरल


Last Updated on January 13, 2023 by Piyush

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील भारंबावाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटप केले. निवडणुकीत मतदान पडले नाही म्हणून त्यांनी तुम्ही मतदान केले नाही, आमचे पैसे परत द्या, अन्यथा मंदिरात जाऊन देवाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा, असे म्हणत मतदारास वेठीस धरण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओची क्लिप पंचक्रोशीत सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या देशात नेहमी कोणत्या न कोणत्या निवडणुका होतच असतात. अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत मतदार मतदान करतात. या मतदारांना गुप्तपणे पैसे किंवा अन्य वस्तू वाटण्यात येतात. अशाच पदद्धीने कन्नड तालुक्यातील पिशोर नजीक असलेल्या भारंबा व भारंबावाडी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.

यावेळी जनतेतून सरपंच निवड होत असल्याने सरपंचपदासाठी उभा असलेल्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर पैसा वाटला खरा. परंतु पराभूत झाल्याने नाराज झालेल्या उमेदवाराने मतदारांना धडा शिकवण्यासाठी चक्क वाटलेल्या पैशाची वसुली सुरू केली असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओत एक वृद्ध मतदार व सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचा पती एकमेकांशी बोलताना दिसत आहेत, तुम्ही पैसे घेऊनही आम्हाला मतदान केले नाही, असा आरोप त्या उमेदवाराच्या पतीने केल्याचे दिसते.

arrow

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा

तेव्हा तो वृद्ध आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचा दावा करताना दिसतो व आम्ही तुमच्या घरी आलो होतो का, असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा उमेदवाराच्या पतीने आम्ही तुम्हाला पैसे मतदानासाठी दिले होते, बाजारासाठी नव्हे, असे उत्तर दिले, तेव्हा मतदाराने हे सगळे तुम्हाला शोभत नाही, असे म्हटले तेव्हा उमेदवाराच्या पतीने शहाणी सुरती माणसे पैसे घेऊन मतदान करीत नाहीत, असे म्हणत त्रागा केला व देवाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा म्हटल्यानंतर लगेच ‘मतदार’ देवाच्या डोक्यावर हात ठेवत, आम्ही तुम्हाला मतदान केल्याचे सांगतो, त्यानंतर विषय संपतो. मग दोघेही घरी जातात. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तालुक्यात या व्हिडीओची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

arrow

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा