उच्चशिक्षित शेतकऱ्याची कमाल! तंत्रज्ञानाच्या बळावर केले विविध यशस्वी प्रयोग


Last Updated on December 12, 2022 by Piyush

लातूर : उदगीर तालुक्यातील हेर येथील उच्चशिक्षित शेतकरी पिता-पुत्रांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शेतीत प्रगती साधली आहे. शेतीतील यशस्वी कथा, प्रयोगशीलता पाहून अन्य शेतकऱ्यांना ती फलदायी ठरली आहे.

हेर येथील राज्य शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी बाबासाहेब बाळासाहेब पाटील हे उच्चशिक्षित असून, त्यांचा मुलगा अनंत पाटील हाही एम.ए.बी.एड. आहे. बाबासाहेब पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे लक्ष देण्याचे ठरविले आणि आधुनिक शेतीसाठी विदेशातील शेतीचे तंत्र, पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतिशील शेती पाहून शेतीत आधुनिक प्रयोग करून उत्पन्न चांगल्या प्रकारे घेण्याचा प्रयत्न केला. यात ते यशस्वी ठरले.

बाबासाहेब पाटील यांना ४० एकर शेती आहे. ते गत वीस वर्षांपासून शेतीत रमले आहेत. उच्च शिक्षित मुलगा अनंत बाबासाहेब पाटील हाही साथ देत आहे. प्रारंभी त्यांनी पारंपरिक शेती केली. मात्र, त्यातून लागवड खर्चही पदरी पडत नसल्याने विदेशातील शेतीतंत्राची माहिती घेतली. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आधुनिक शेतीची पाहणी केली.

२००३ मध्ये ठिंबक सिंचनाचा अवलंब करून दोन एकरांवर द्राक्ष लागवड केली. पहिल्याच प्रयोगातून त्यांना एकरी २१ टन द्राक्ष उत्पादन मिळाले. दरम्यान, त्यांनी सोयाबीन, हरभरा, तूर ही पारंपरिक पिके घेण्याबरोबरच अद्रकाचे उत्पादन घेतले.

ज्वारी, हरभरा पिकाबरोबरच २००५ मध्ये तीन एकरांवर द्राक्ष लागवड केली. त्यासाठी त्यांनी गावरान आणि हिरवळीच्या खताचा जास्तीत जास्त वापर केला. त्यातून त्यांना दहा लाखांचे उत्पादन मिळाले. त्यातूनच ते फळबाग शेतीकडे वळले. आजघडीला त्यांच्या शेतात सहा बोअर, एक विहीर, मोठे शेततळे असून, या पाण्यावर शेतीत विविध प्रयोग सुरू केले आहेत.

द्राक्ष, आद्रक व अन्य फळबाग

पारंपरिक शेतीबरोबरच द्राक्ष, आद्रक अन्य फळपिके घेऊन उत्पादन खर्चाच्या तुलनेत नफ्याची शेती होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण हेर येथील शेतकरी बाबासाहेब पाटील यांचे आहे. गहू, हरभरा, ज्वारी, सोयाबीन आदी पारंपारिक पिके घेण्यासाठी खर्च कमी आणि उत्पादन कसे जास्त घेता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. कमी पाणी, कमी खर्च आणि सेंद्रिय खताचा वापर करून शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे.

वाचा : सांगली जिल्ह्यातून १२० टन द्राक्षे दुबईला रवाना