टीईटी घोटाळा : मंत्र्यांच्या मुलांचे प्रश्न का वगळले?


Last Updated on December 22, 2022 by Vaibhav

नागपूर : राज्यात गाजलेल्या शिक्षक भरतीतील टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या मुद्दयावरून बुधवारी विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न उपस्थित केला होता. आपण टीईटी परीक्षा घोटाळ्यासंदर्भात ७ प्रश्न विचारले होते. मात्र, त्यातील दोन महत्त्वाचे प्रश्न का वगळण्यात आले, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

विद्यमान मंत्री(minister), आमदारांच्या मुलांचा या घोटाळ्यात सहभाग आहे का? आणि मंत्र्यांची मुले घोटाळ्यात सहभागी असल्याने कारवाईला विलंब होत आहे का? हे पवारांनी विचारलेले लेखी प्रश्न प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेतून वगळण्यात आले होते. ही बाब पवारांनी लक्षात आणून दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची चौकशी करून अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

पवार यांच्यासह दिलीप वळसे- पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मागणी केल्यानुसार प्रश्न राखून ठेवण्यात आला.

■ टीईटी घोटाळ्याप्रकरणी ७५०० उमेदवारांना अपात्र करण्यात आले आहे, बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या २१३, गुणात फेरफार केलेल्या २१ जणांनाही अपात्र करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

■ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर चर्चा करू नये अशी भूमिका केसरकर यांनी मांडली. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत अशी अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, मग कोणत्याच मुद्दयावर चर्चा करता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित

■ विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांचा मुद्दा खोडून काढत न्यायप्रविष्ट प्रकर- णावर सभागृहात चर्चा करू नये असा नियम असल्याचे सांगितले. त्यावर हा नियम शिथिल करण्याची विरोधकांनी मागणी केली पण तीही अध्यक्षांनी फेटाळून लावली.

सत्तारांवर होता रोख

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावे टीईटी प्रकरणात समोर आली होती. त्यामुळे अजित पवारांनी विचारलेल्या प्रश्नांचा रोख हा सत्तार यांच्याकडे होता. मात्र तेच प्रश्न नेमके पुस्तिकेतून वगळण्यात आले होते.

हेही वाचा: राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले