Last updated on January 8th, 2022 at 11:14 pm
पालिका करणार १९,४०१ टॅब्सची खरेदी
मुंबई : पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १० वीच्या मुलांसाठी तब्बल १९, ४०१ टॅब खरेदी केले जाणार आहेत. महापालिका शाळांमधील मराठी हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी या टॅबचे वाटप केले जाणार आहे. एका टॅबसाठी महापालिका १७ हजार ४०० रुपये खर्च करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणासाठी १० वीच्या मुलांना हे टॅब उपयोगी ठरणार त. चालू शैक्षणिक वर्षामध्ये या टॅबचे वाटप करणे अपेक्षित आहे. मात्र खरेदीला झालेल्या विलंबामुळे नवीन शैक्षणिक वर्षातच हे नवीन टॅब मुलांच्या हाती पडण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात येतात. यापूर्वी आठवी, नववी आणि १० वीच्या मुलांसाठी सुमारे ४४ हजार टॅबची खरेदी करण्यात आली होती. आता १० वीच्या मुलांसाठी आणखी १९ हजार ४०१ टॅबची खरेदी केली जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये पात्र कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १९ हजार ४०१ टॅबच्या खरेदीसाठी इडुसपार्क इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली आहे. सन २०२१-२६ या कालावधीसाठी या टॅबची खरेदी करण्यात येणार आहे. यामध्ये एका टॅबची खरेदी एक वर्षाच्या हमी कालावधीसह ११ हजार रुपयांमध्ये खरेदी केली जात आहे. याशिवाय चार वर्षांची जास्त गॅरंटी, अभ्यासक्रम तयार करणे व टॅबमध्ये अपलोड करणे यासाठी अधिक ६ हजार ४०० रुपये याप्रमाणे एकूण १७ हजार ४०० रुपये खर्च केला जाणार आहे.
महापालिका शाळांमधील १० वीच्या मुलांना पाठ्यक्रम समाविष्ट असलेले हे टॅब असून सध्या जुने टॅब हे १० वीच्या विद्यार्थ्यांकडे आहेत. त्यामुळे टॅबअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नसून जुन्या टॅबवर त्यांचा अभ्यासक्रम सुरू आहे. तर नवीन टॅब हे आगामी शैक्षणिक वर्षापासून वितरीत केले जातील, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लग्नाचे वय २१ होणार असल्याने तारांबळ