तरंगवाडीच्या द्राक्षांची गोडी आता दुबई, थायलंडमध्ये


Last Updated on December 30, 2022 by Vaibhav

इंदापूर : शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर, काटेकोर नियोजन, कीटकनाशक, बुरशीनाशकाचा अत्यंत माफक वापर, अपार मेहनतीला मिळालेली निसर्गाची साथ यामुळे लौकिकप्राप्त झालेली, काल-परवापर्यंत देशांतर्गत वा जास्तीत जास्त बांगलादेशपर्यंत पोहोचलेली तरंगवाडी गावच्या द्राक्षांची गोडी” चालू आठवड्यापासून दुबई, थायलंडमध्येही पोहोचणार आहे.

इंदापूर तालुक्यातील विशेषतः तरंगवाडी भागातील बागायतदारांची कर्तबगारी विशेष लक्षणीय आहे असे सांगून वाघमोडे म्हणाले की, तरंगवाडी भागातील हलक्या पोताच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑगस्टपासूनच फळ छाटणीला सुरुवात केली होती. भारी मगदुराच्या जमीनमालकांनी सप्टेंबरपासून फळ छाटणीला सुरुवात केली. कमीत कमी कीटकनाशक, बुरशीनाशकांचा वापर व अनुकूल वातावरण यामुळे तेथे अप्रतिम चवीची उर्वरित अंशविरहित द्राक्ष तयार होत आहेत.

टपोरी, गोड, रसाळ द्राक्षे देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. परिणामी, चालू वर्षी द्राक्षांना प्रतिकिलोस १०० ते १४१ रुपये असा समाधानकारक बाजारभाव मिळतो आहे. काल-परवापर्यंत द्राक्ष व्यापारी देशांतर्गत जास्तीत जास्त बांगलादेशला द्राक्ष पाठवीत असत; परंतु चालू आठवड्यापासून दुबई, थायलंड या देशांनाही द्राक्ष पाठवण्याच्या तयारीत निर्यातदार दिसत आहेत, असे वाघमोडे म्हणाले.

फळ छाटणीच्या तारखा विभागल्या गेल्यामुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष हंगाम डिसेंबर ते एप्रिल असा चालणार आहे. उत्तम प्रतीची रंगीत द्राक्ष देशात व परदेशातही ग्राहकांना मिळणार आहे, असे संकेत त्यांनी दिले.

■ कृषितज्ज्ञ, म. फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व कोरोना महामारीमुळे द्राक्ष बागायतदार पुरता मेटाकुटीला आला होता;
■ चालू हंगामामध्ये तरुण द्राक्ष बागायतदारांनी शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर करून काटेकोर नियोजन केले. त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीला निसर्गाची साथ मिळाली.
■ यामुळे चालूवर्षीचा हंगाम द्राक्ष शेतीला नवी दिशा देणारा ठरत असल्याचे जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून आगाप फळ छाटणी झालेल्या द्राक्षांचा तोडणी हंगाम सुरु झाला आहे, असे वाघमोडे म्हणाले.

हेही वाचा: भाव नसल्याने कांदा लागवडीत घट