Last Updated on January 6, 2023 by Vaibhav
हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल जवळील जातेगाव येथील रोशनी व वायघोळ धरणाच्या पाटाच्या पाण्यावर हरसूल भागातील शेतकऱ्यांची उन्हाळी भात शेतीची लगबग सुरू असून, काही ठिकाणी भात अवणीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
हरसूल भागात रोशनी, वायघोळ साठवण तलाव आहेत. यामुळे येथील शेतकरी पाटाच्या पाण्यावर विविध प्रकारची शेती करत सुजलाम सुफलाम आहेत. शेतीत अनेक पिके घेत असून, त्यात उन्हाळी भात पिकाचाही समावेश आहे. उन्हाळी भात पीक कणखर तसेच रोग रहित येत असल्याने या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भात पिकाची अवनी करतात. पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्याच्या भात पीकाच्या उत्पन्नांत कमी घट येत असल्याने उत्पादन वाढीस मदत होत आहे. सद्यस्थितीत हरसूल भागातील जातेगाव, चिरापाली, सापतपाली, नाचलोंढी, चिंचवड तसेच वायघोळ भागात उन्हाळी भात शेतीच्या अवण्याच्या कामांची लगबग सुरू असून शेतकरी कामात व्यस्त आहे.
उन्हाळी भात पिकांवर कुठलाही रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने उत्पादन वाढीस मदत होत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून हरभरा तसेच विविध पिकांबरोबर उन्हाळी भात पिका संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या आलेखात बदलत्या शेतीचा आलेख उंचावत आहे. • संदीप वळवी, तालुका कृषी अधिकारी, त्र्यंबकेश्वर
रोशनी साठवण तलावाच्या पाटाच्या पाण्यावर उन्हाळी भात पिकाची अवनी केली असून, भात पिकाच्या उत्पादन वाढीस मदत होणार आहे. निरोगी आणि कणखर पीक येत असल्याने पावसाळ्यापेक्षा उन्हाळी भात पीक परवडणारे आहे.– अजय कनोजे, शेतकरी, चिरापाली
हेही वाचा: कडधान्य पिकांवरील कीड नियंत्रण आवश्यक