भिगवण : इंदापूर व दौड तालुक्यात गाजलेल्या शेटफळगढे येथील सुजित जगताप याच्या खुनाच्या कारणाचे रहस्य भिगवण पोलिसांनी उलगडल्याचे समजत आहे. मात्र, पोलिसांनी याला दुजोरा न देता सर्व बाजू तपासण्यात येत असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सुजितच्या खुनाला अंधश्रद्धेची नव्हे, तर चारित्र्याच्या संशयाची किनार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सध्या आहे.
दरम्यान, मृत सुजितच्या जवळच्या नातेवाइकांकडून थोडी पुष्टीही मिळत असल्याने सुजितच्या खुनामगाचे अंधश्रद्धेचे मळभ काही प्रमाणात दूर झाल्याचे खात्रीलायक समजते. सुजितचा खून त्याचा चुलत भाऊ किशोर जगताप याने केल्याचे भिगवण पोलिसांनी गेल्या आठवड्यात उघडकीस आणले होते. मात्र, खुनाचे नेमके कारण पुढे येत नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क काढले जात होते. त्यातही हा प्रकार अंधश्रद्धेतून असण्याची जोरदार चर्चा या भागात होती. विशेषतः सुजितचे वडील संभाजी जगताप, तसेच आई, पत्नी, जवळचे नातेवाईक आणि ग्रामस्थही हीच शक्यता व्यक्त करीत होते.
मात्र, आता या घटनेला वेगळेच वळण लागल्याची चर्चा असून, घटनेतील संशयित आरोपी किशोर याच्या डोक्यात चारित्र्याच्या संशयाचे भूत शिरल्याने त्याने हा खून केल्याची चर्चा आहे. अर्थात, या खून प्रकरणामागचे अंधश्रद्धेचे मळभ दूर झाले असले, तरी किशोर हा भित्रा होता. रानावनात तो एकटा जात नव्हता. त्यामुळे सुजितचा खून एकटा किशोर करू शकत नाही, असे मत सुजितचे वडील संभाजी जगताप, त्यांचे कुटुंब व गावकरी व्यक्त करीत आहेत. यामध्ये आणखी काहींचा समावेश असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला व त्या दिशेने तपास व्हावा, अशी मागणी संभाजी जगताप व महेश जगताप यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना केली आहे.
सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सुजित संभाजी जगताप याचा खून त्याचाच चुलत भाऊ किशोर बाळासो जगताप याने केल्याचे भिगवण पोलिसांनी गेल्या आठवड्यात उघडकीस आणले. मात्र, खुनाचे कारण गुलदस्तात असल्याने याचे गूढ वाढले होते. मात्र, पोलिसांनी या घटनेचा सखोल व मुळाशी जाऊन तपास सुरू केलेला असून, हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचल्याचे समजत आहे. याबाबत भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या या घटनेचा खोलवर व सर्व बाजू तपासून तपास सुरू असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.
लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल