बनायचे होते क्रिकेटर, पण ‘त्या’ अपघातामुळे उदय कोटक बनले १ लाख ११ हजार कोटींच्या संपत्तीचे मालक – Uday Kotak

भारतात एकूण १२ सरकारी आणि २१ खासगी बँका आहेत. तसं एकूण बँकांचा आकडा पाहिला, तर ९१ कमर्शियल बँका भारतात कार्यरत आहेत. या सर्व बँकांमध्ये एक बँक अशी आहे, जिने कमी काळात आपला ठसा उमटवला. ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक. याच बँकेचे संस्थापक असलेले उदय कोटक यांनी शुक्रवारी (दि. १५ मार्च) ६५व्या वयात पदार्पण केले. भारतातील सर्वात यशस्वी बँकरमध्ये गणले जाणारे उदय कोटक यांनी बँकिंग क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा यशस्वी बँकर बनण्यापर्यंतचा अचंबित करणारा प्रवास पाहणार आहोत. चला तर, वेळ न घालवता सुरुवात करूयात.

बनायचं होतं क्रिकेटर, पण झाला ‘तो’ अपघात

आयुष्यभर संघर्ष करायला लावणारा एखादा अपघात तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो का? हो बनवू शकतो. जर तुम्ही हा प्रश्न उदय कोटक यांना विचारला, ज्यांनी अपघातानंतर १३ अब्ज डॉलर्सहून अधिक संपत्ती कमावली आहे. खरं तर, उदय कोटक (Uday Kotak) यांचा जन्म १५ मार्च, १९५९ रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला. ते अभ्यासात हुशार होते, पण त्यांचं पहिलं प्रेम हे क्रिकेट होतं. मुंबईत लहानाचे मोठे झालेल्या उदय कोटक यांना क्रिकेटपटू (Uday Kotak Cricketer) बनण्याची इच्छा होती. ते एक चांगले खेळाडू होते. एवढंच काय, तर त्यांनी प्रसिद्ध प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षणही घेतलं होतं.

जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना ते त्यांच्या कॉलेज टीमचे कर्णधार होते. कांगा लीग सामन्यादरम्यान, एक चेंडू येऊन त्यांच्या डोक्यावर लागला. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यांनी बरेच महिने घेतले. यामुळे त्यांना वर्षभर कॉलेजलाही मुकावे लागले. अशात तुम्ही त्यांना अपघाती बँकर म्हणू शकता. कारण, क्रिकेटमध्ये चांगले करिअर होत असताना एका अपघाताने त्यांना वित्त (Finance) या क्षेत्रात आणले.

त्यांनी कष्ट आणि जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आपले करिअर सुरू केले. त्यांनी टाटा समूहात काम केले आणि नंतर स्वतःची बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोटक महिंद्रा बँक आज भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेने अनेक क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उदय कोटक हे एक दूरदर्शी लीडर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अनेक तरुणांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले आहे.

उदय कोटक यांचे कुटुंब

अब्जाधीश उदय कोटक यांनी १९८५ साली पल्लवी कोटक यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव जय कोटक आणि धवल कोटक आहे. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. उदय हे एक गुजराती हिंदू परिवारातून येतात. त्यांनी मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून वाणिज्य शाखेची पदवी आणि एमएमएस पदवी घेतली आहे. त्यांना बँकिंग आणि वित्त क्षेत्रात ३५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

भारताचे सर्वात श्रीमंत बँकर

कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांची बँकेत २५.७१ टक्के भागीदारी आहे, त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत बँकर (India’s Richest Banker Uday Kotak) आहेत. या बँकेचे मूल्य ३.५ लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. उदय कोटक यांच्या संपत्तीचा विचार करायचा झाला, तर फोर्ब्स इंडियानुसार त्यांची एकूण संपत्ती ही तब्बल १ लाख ११ हजार ४७४ कोटी इतकी आहे.

कधी केली होती सुरुवात?

उदय कोटक यांनी वयाच्या २३व्या वर्षी सन १९८५मध्ये कोटक कॅपिटल फायनान्स लिमिटेड नावाची एक आर्थिक सल्ला देणारी फायनान्स फर्म सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी २००३ मध्ये या फर्मला एका बँकेच्या रूपात बदलले. उदय यांनी त्यांचा वित्त आणि बिल डिस्काऊंटिंग व्यवसाय कुटुंब आणि मित्रांकडून घेतलेल्या १० हजार रुपयांनी सुरू केला होता. ही रक्कम आताच्या हिशोबानुसार तब्बल ३०० कोटी रुपये होते. विशेष म्हणजे, गुंतवणुकीचा मोठा भाग हा त्यांचे सर्वात चांगले मित्र आनंद महिंद्रा यांनी दिला होता. त्यामुळे बँकेचे नाव कोटक महिंद्रा (Kotak Mahindra) ठेवण्यात आले.

इतिहासात पहिल्यांदा एनबीएफसीला (NBFC) मिळाला बँकेचा परवाना

कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला २२ मार्च, २००३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळाला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासात, ही भारताची पहिली गैर-बँकिंग वित्त कंपनी आहे, जिने बँकिंग परवाना मिळवला. तसेच, एक गैर-बँकिंग वित्त कंपनीचे रुपांतर बँकेत झाले. सन २०१४मध्ये उदय कोटक यांनी छोट्या बिल-डिस्काऊंटिंग व्यवसायाला वित्तीय सेवा समूहात बदलले. तसेच, १२७० पेक्षा जास्त शाखांसह बाजार भांडवलाने भारतातील दुसरी सर्वात मोठी अनुसूचित व्यावसायिक बँक बनली.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त

भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा कमाल कार्यकाळ १५ वर्षे निश्चित केला आहे. त्यामुळे उदय कोटक हे डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटी निवृत्त होणार होते. मात्र, त्यांनी निवृत्तीच्या चार महिन्याआधीच म्हणजे सप्टेंबरमध्येच निवृत्तीची घोषणा केली होती.

तर असा आहे उदय कोटक यांचा यशस्वी प्रवास. तुम्हाला उदय कोटक यांची स्टोरी आवडली असेल, तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच, मित्रमंडळींना हा लेख फॉरवर्ड करायला तर अजिबात विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या यशस्वी लोकांविषयी लेख वाचायला आवडेल, हेदेखील कमेंटमध्ये नक्की सांगा.