अकोला : यंदा गत ५० वर्षांमधील विक्रमी दर मिळाले असून, प्रथमच पिवळ्या सोन्याला चकाकी मिळाली. सुरुवातीच्या काळात सुरुवातीला सोयाबीनची चमक कायम होती. त्यानंतर, अचानकच भाव कोसळल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित होता. मात्र, त्यानंतर आता सोयाबीनचे भाव चढ-उताराचा पल्ला गाठत पुन्हा स्थिरावले आहे.
सद्य:स्थितीत शहरातील बाजार समितीत सोयाबीन सरासरी ५,९०० रुपये प्रति क्विंटल विक्री होत असून, गत दोन दिवसांत आवकही वाढल्याचे चित्र आहे. यापुढे भाव वाढतील की नाही, याबाबत मात्र शेतकरी संभ्रमात असून, बाजाराचा अंदाज बांधत असल्याचे दिसून येत आहे.
हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. यंदा प्रथमच सोयाबीनला विक्रमी अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा जास्त असल्याने, बाजारातील अस्थिरतेमुळे सोयाबीन नेहमी चर्चेत आहे. सुरुवातीला ७ ते ८ हजार रुपये दर मिळत असल्याने आवक वाढली होती. त्यानंतर मात्र, अचानक दर पुन्हा खाली आले.
आता सोयाबीन दर स्थिरावल्याचे चित्र आहे. बाजारात बुधवारी कमीतकमी ५,२०० रुपये तर जास्तीतजास्त ६,२०० ६,२०० रुपयांपर्यंत सोयाबीनची विक्री झाली आहे. अशा स्थितीत सोयाबीनची आवक वाढणार का की, पुन्हा शेतकरी साठवणुकीवर भर देणार हे मात्र अनुत्तरीत आहे.
बाजारांवर शेतकऱ्यांची नजर
सोयाबीनला वायद्यांमधून वगळल्यानंतर बाजार समितीत दर मागणी व पुरवठ्यांवर ठरत आहेत. शेतकरीही सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करीत असल्याने आवकही साधारण आहे. त्यामुळेच बाजार समितीत सोयाबीनचे दर हे टिकून असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून बाजारात दर स्थिर आहेत. शेतकरी आता बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीनची विक्री करणार, असे चित्र दिसत आहे.
पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण