सोयाबीन दरवाढीची अद्याप प्रतीक्षाच


Last Updated on December 15, 2022 by Vaibhav

दराची कोंडी फुटेना : बळीराजाचे अर्थकारण कोलमडले निसर्गाचा लहरीपणा व अवकाळीच्या संकटावर मात करुन पदरी पडलेले सोयाबीन दराची कोंडी फुटत नसल्याने घरातच आहे. शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी दरवाढीच्या प्रतीक्षेतच आहे. सोयाबीनच्या उत्पन्नावरच रब्बीसह कौटुंबिक खर्चाचे नियोजन अवलंबून असल्याने बळीराजाचे अर्थकारण कोलमडून गेले आहे.

यावर्षी मान्सून लांबणीवर पडल्याने खरीप हंगामातील पेरणी लांबणीवर पडली. त्यानंतरही अतिवृष्टी, पूर, अवकाळी अशा संकटांवर मात करुन जे उत्पादन पदरी पडले, तेही सुमारे दोन महिन्यांपासून दरवढीच्या प्रतीक्षेत घरातच पडून आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनचा दर ५५०० ते ५७०० रुपयांवरच स्थिर आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी हाच दर सुमारे दहा हजारांवर पोहचला होता.

मात्र, त्यावेळी बळीराजाकडे पेरणीसाठीही सोयाबीन नव्हते. सोयाबीन सुगी सुरू झाल्यावर सोयबीनला क्विंटलला सहा हजार दर मिळत होता. वाढती महागाई व खते- औषधांसाठीचा होणारा खर्च भरुन काढण्यासाठी सध्याचा दर पुरेसा नाही. त्यामुळे बहुतांशी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. सोयाबीनच्या उत्पन्नावरच रब्बीसह कौटुंबिक खर्चाचे नियोजन अवलंबून असल्याने असल्याने बळीराजाचे अर्थकारण कोलमडून गेले आहे.

खरीप हंगाम मध्यावर आला तरी सोयाबीन दराची कोंडी फुटत नसल्याने बळीराजाचे अर्थकारण पूर्णत: कोलमडून गेले आहे. गेल्या काही वर्षात मान्सूचे वेळापत्रक बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. कधी पेरणी पावसा वाचून वाया जात आहे तर कधी हाताशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावला जात आहे. केवळ जगण्याची जिद्द व कष्टासाठी असलेल्या चिकाटीच्या जोरावरच बळीराजा उद्याच्या आशेवर टिकून आहे. संकटांवर मात करुन पिकवलेल्या शेतमालाला बाजारपेठेत मोल न मिळाल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळे शेतीमालाला हमी भाव द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

पावसानं तारलं.. पण दरानं मारलं…

यावर्षी खरिपातील सर्व पिकांना अतिवृष्टी व परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. ऐन काढणीत परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले होते. तरी देखील सोयाबीन पिकानं पावसातही तग धरल्याने शेतकरी वर्गाला नुकसानीपासून तारलं आहे. मात्र, मळणी करुन घरात आलेल्या सोयाबीनला दर मिळत नसल्याने अनेक मोठ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची रास घरात पडून आहे. ‘पावसानं तारलं.. पण दरानं मारल’, अशी म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

हेही वाचा: आंतरपिकातून कमावले १५ लाख, शहा यांच्या दीड एकरात बहरली केळी व झेंडू