Last updated on January 10th, 2022 at 12:58 pm
कन्नड तालुका प्रतिनिधी तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळुबा मनगटे या ६० वर्षीय शेतकऱ्याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील घटना
याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार जगन्नाथ मनगटे हे यांच्या भावकीतील कारभारी कौतिक मनगटे यांच्या मुलीचे लग्न गावात होते. त्यासाठी मनगटे हे सहपरिवार गावात लग्नासाठी आले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर ते आपल्या गावालगतच्या शेतातील घरी रात्री एकटेच पायी निघाले होते. लोहगाव- बरकतपूर रस्त्यावरून त्यांच्या शेतातील घराचा रस्ता जातो.
गावापासून पाचशे, सहाशे फुटावर अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर कोयता व धारदार हत्याराने हल्ला केला. डोक्यावर, तोंडावर, पायावर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर पाठीमागून घराकडे परतणाऱ्या त्यांच्या पत्नी ध्रुपदाबाई मनगटे यांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढरी गांधी टोपी पडलेली दिसली. टोपी रक्ताने माखलेली होती. त्यांना काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता पती जगन्नाथ हे रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात खोल खड्डयात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी ताबडतोब ही माहिती कुटुंबातील सदस्यांना दिली. त्यानंतर योगेश संजय मनगटे, मच्छिद्र मनगटे यांनी त्यांना जगन्नाथ मनगटे यांना सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत मारेकऱ्यांचा शोध घेतला. या खूनप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत. या खुनामागचे नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत आहेत.
तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू